Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाची मोहीम सुरू! ७२व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी संकेत सावंतकडे नेतृत्व गुजरातच्या बडोद्यात महाराष्ट्र सज्ज महाराष्ट्राच्या विजयी स्वप्नांची रणशिंग फुंकली!


 

महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाची मोहीम सुरू!

७२व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी संकेत सावंतकडे नेतृत्व गुजरातच्या बडोद्यात महाराष्ट्र सज्ज

महाराष्ट्राच्या विजयी स्वप्नांची रणशिंग फुंकली!

 

मुंबई : राष्ट्रीय कबड्डीच्या रंगमंचावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकवण्यासाठी राज्याचा बलाढ्य पुरुष संघ सज्ज झाला आहे! गुजरात कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने आयोजित ७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने दमदार संघ जाहीर केला असून, मुंबई शहरच्या संकेत सावंत याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. आपल्या आक्रमक नेतृत्व आणि विजयी कामगिरीमुळे चर्चेत असलेला संकेत सावंत आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देईल का, याकडे संपूर्ण कबड्डी विश्वाचे लक्ष लागले आहे.

 

नेतृत्वाची जबाबदारी – संकेत सावंतवर महाराष्ट्राचा विश्वास

महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे नेतृत्व संकेत सावंत (मुंबई शहर पूर्व) याच्याकडे सोपविण्यात आले असून, आदित्य शिंदे (अहमदनगर) याच्याकडे उपसंघनायकाची जबाबदारी देण्यात आली आहे. संकेत सावंतने मुंबई शहर संघाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर एका वर्षात राज्य अजिंक्यपद निवड चाचणी (अहमदनगर), छत्रपती शिवाजी महाराज चषक (जळगाव) आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक कबड्डी स्पर्धा (बारामती) या ३ प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून मुंबईला ऐतिहासिक ‘हॅट्रिक’ मिळवून दिली, ही त्याची उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यामुळे आता त्याच्याकडून महाराष्ट्रासाठीही विजेतेपदाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

बडोद्यात रंगणार राष्ट्रीय महासंग्राम

ही प्रतिष्ठेची स्पर्धा दि. २४ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गुजरात, बडोदा येथील सागा बंदिस्त क्रीडा संकुलात पार पडणार आहे. गतवर्षी कटक (ओडिशा) येथे झालेल्या ७१व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ पंजाबकडून उपउपांत्य फेरीत पराभूत झाला होता, त्यामुळे यंदा त्या पराभवाची परतफेड करत विजेतेपद पटकावण्याचा महाराष्ट्राचा निर्धार आहे.

 

महाराष्ट्राचा संघ विजयी मोहिमेसाठी रवाना

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दादर येथील कार्यालयात संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे सचिव मोहन गायकवाड यांनी संघाची अधिकृत घोषणा केली. हा संघ दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वा. दादर रेल्वे स्थानकातून रणकपूर एक्स्प्रेसने स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक वर्ग विजेतेपदासाठी पूर्ण आत्मविश्वासाने सज्ज आहेत.

 

महाराष्ट्राचा निवडलेला पुरुष संघ – ताकद, अनुभव आणि जिद्दीचा संगम

संकेत सावंत (संघनायक) – मुंबई शहर पूर्व, आदित्य शिंदे (उपसंघनायक) – अहमदनगर, असलम इनामदार – ठाणे ग्रामीण, सौरभ राऊत – अहमदनगर, शिवम पठारे – अहमदनगर, सुरेश जाधव – पुणे ग्रामीण, दादासो पुजारी – कोल्हापूर, साईप्रसाद पाटील – कोल्हापूर, अजित चौहान – पुणे ग्रामीण, आदित्य पोवार – कोल्हापूर, जयेश महाजन – नंदुरबार, अनुज गावडे – पुणे ग्रामीण, सौरभ फागरे – कोल्हापूर, अल्केश चव्हाण – औरंगाबाद.

 

प्रशिक्षण व व्यवस्थापन – अनुभवी मार्गदर्शनाची साथ

महाराष्ट्राच्या संघाला अनुभवी प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांचे मार्गदर्शन लाभणार असून, व्यवस्थापक अक्षय जाधव संघाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच फिजिओ पुरुषोत्तम प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली असून, खेळाडूंच्या फिटनेस आणि पुनर्वसनाची जबाबदारी ते पार पाडतील.

 

महाराष्ट्राच्या विजयी झेंड्याची प्रतीक्षा

संकेत सावंतच्या नेतृत्वाखालील हा संतुलित, आक्रमक आणि अनुभवी संघ ७२व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकावेल, अशी आशा संपूर्ण कबड्डी प्रेमी व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राच्या या विजयी मोहिमेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Post a Comment

0 Comments