Type Here to Get Search Results !

पत्रकार भवनात क्रीडा इतिहासाचा नवा अध्याय! क्रिकेट टर्फला क्रीडा पत्रकारमहर्षी कै. वि. वि. करमरकर यांचे नाव २५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य उद्घाटन सोहळा


 

पत्रकार भवनात क्रीडा इतिहासाचा नवा अध्याय!

क्रिकेट टर्फला क्रीडा पत्रकारमहर्षी कै. वि. वि. करमरकर यांचे नाव

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य उद्घाटन सोहळा

 

मुंबई : मुंबईतील क्रीडा पत्रकारितेच्या सुवर्ण परंपरेला साजेसा आणि प्रेरणादायी असा ऐतिहासिक निर्णय घेत मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक क्रिकेट टर्फला क्रीडा पत्रकारमहर्षी कै. वि.वि. करमरकर यांचे नाव देण्याचा अभिमानास्पद उपक्रम हाती घेतला आहे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये स्वतंत्र क्रीडा पानाची संकल्पना रुजवणारे आणि क्रीडा पत्रकारितेला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना साजेशी ही कृतज्ञतेची सलामी ठरणार आहे.

 

उद्घाटनाचा सोहळा ठरणार ऐतिहासिक

या अत्याधुनिक क्रिकेट टर्फचे उद्घाटन येत्या बुधवारी, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. क्रीडा विश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकच दिमाखदार होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव उन्मेश खानविलकर यांची उपस्थिती लाभणार आहे. क्रीडा क्षेत्रातील या मान्यवरांच्या साक्षीने पत्रकार भवनात नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.

 

क्रीडा पत्रकारितेचे जनक – करमरकरांची छाप

कै. वि.वि. करमरकर यांनी मराठी वर्तमानपत्रांमध्ये क्रीडा पत्रकारितेला स्वतंत्र आणि सन्मानाचे व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या लेखणीतून मराठी वाचकांना दर्जेदार, माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक क्रीडा लेखनाचा परिचय झाला. त्यांनी क्रिकेट बरोबर, खो-खो, कबड्डी, कुस्ती सारख्या भारतीय खेळांना सुध्दा क्रीडा पानावर मानाच स्थान मिळवून दिले. ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे सक्रीय सदस्य होते. त्यांच्या कार्याचा वारसा जतन करण्यासाठी आणि भावी पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळावी या उद्देशानेच हा टर्फ त्यांच्या नावाने समर्पित करण्यात येत असल्याचे संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.

 

पत्रकारांसाठी मोफत सुविधा – बॉलिंग मशीनही लवकरच

नव्या क्रिकेट टर्फचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे ही सुविधा मराठी पत्रकारांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध असणार आहे. आगाऊ नोंदणी करून पत्रकारांना या टर्फचा वापर करता येणार आहे. याशिवाय लवकरच येथे बॉलिंग मशीन उपलब्ध करून देण्यात येणार असून सरावासाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. पत्रकारितेतील तणावपूर्ण जीवनशैलीत क्रीडेला चालना देणारा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह मानला जात आहे.

 

उभारणीसाठी मोलाचे सहकार्य

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीत वि.वि. करमरकर फाऊंडेशनचे भास्कर सावंत, संजय परब तसेच स्पोर्ट्सझिलाचे संचालक नील गायकवाड यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या पाठबळामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला असल्याची माहिती कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी दिली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारलेले हे क्रिकेट टर्फ पत्रकार भवनाच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे.

 

प्रेरणेचा नवा केंद्रबिंदू

पत्रकार भवनातील हे क्रिकेट टर्फ केवळ एक क्रीडा सुविधा नसून मराठी क्रीडा पत्रकारितेच्या समृद्ध परंपरेचा अभिमान आहे. कै. वि. वि. करमरकर यांच्या नावाने ओळखले जाणारे हे टर्फ भविष्यातील क्रीडा पत्रकारांना प्रेरणेचा नवा केंद्रबिंदू ठरेल, यात शंका नाही. पत्रकारितेच्या विश्वात क्रीडेला नवे बळ देणारा हा उपक्रम मुंबईच्या क्रीडा संस्कृतीत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

 

Post a Comment

0 Comments