Type Here to Get Search Results !

काश्मिर खोऱ्यात नवी क्रिकेटची पहाट! ६६ वर्षांची प्रतीक्षा संपली!! रणजीत क्रांतीचा उदय!!! ३३५ सामन्यांनंतर रणजीवर जम्मु-काश्मिरचा झेंडा लेखक : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार – सुहास जोशी

 


काश्मिर खोऱ्यात नवी क्रिकेटची पहाट!

६६ वर्षांची प्रतीक्षा संपली!! रणजीत क्रांतीचा उदय!!!

३३५ सामन्यांनंतर रणजीवर जम्मु-काश्मिरचा झेंडा

लेखक : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार – सुहास जोशी

 

भारतीय क्रिकेटमधील बलाढ्य मुंबई, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, हरयाणा, हैद्राबाद, राजस्थान, विदर्भ यांचे वर्चस्व मोडीत काढत जम्मु-काश्मिर संघाने २०२५-२६ च्या रणजी करंडक स्पर्धेत इतिहास घडवला! तब्बल ६६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि ३३५ सामने खेळल्यानंतर मिळवलेले हे जेतेपद भारतीय क्रिकेटमधील मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. १९६० मध्ये पहिला रणजी सामना खेळणारा हा संघ एकेकाळी केवळ सहभागी होणारा संघ, अशी टीका सहन करत होता; पण यंदा त्यांनी पराक्रमाची नवी व्याख्या लिहिली. जम्मु-काश्मिर संघाने या मोसमात बड्या-बड्या संघांना पराभवाचे धक्के देत रुबाबात‌ विजेतेपदाला गवसणी घालुन भारतीय क्रिकेट मध्ये मोठी क्रांती घडवुन आणली आहे व एका दैदिप्यमान कामगिरीला गवसणी घातली आहे.  

 


पराभवातून उभारी, विजयांची मालिकाच

मोसमाच्या सुरुवातीलाच बलाढ्य मुंबईकडून पराभव पत्करावा लागला; मात्र त्या धक्क्यानेच संघ सावरला. बोध घेतला, चुका सुधारल्या, सराव वाढवला आणि त्यानंतर पुढच्या सर्व लढतीत त्यांनी पराभव बघितला नाही. त्यानंतर दिल्ली, राजस्थान, हैद्राबाद, मध्य प्रदेश, प. बंगाल या माजी विजेत्या संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करत खळबळ उडवून दिली. अंतिम लढतीत कागदावर बलाढ्य असलेल्या तब्बल ८ वेळा विजेतेपद पटकावलेल्या कर्नाटकला त्यांच्या घरच्या मैदानावर नमवत जम्मु-काश्मिरने विजयावर दणदणीत शिक्कामोर्तब केले व यापूर्वी मिळवलेले विजय हे निर्णायक ठरवले. सामन्यातील पहिल्या डावातील २६१ धावांची आघाडी निर्णायक ठरली.

 

शुभम, कामरान, साहिल आणि नबी – विजयाचे शिल्पकार

अंतिम सामन्यात शुभम पुंडिर आणि कामरान इक्बाल यांनी शतकी खेळी साकारली; साहिल लोत्रा याने दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली; तर वेगवान गोलंदाज नबी याने ५ बळी घेत प्रतिस्पर्ध्यांची कंबर मोडली. अंतिम सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला तो  शुभम पुंडिर, तर संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक ६० बळी घेणारा नबीसर्वोत्तम खेळाडू’ ठरला.

 

कर्णधार पारस डोगराचे कुशल नेतृत्व

वयाची चाळीशी पार केलेल्या कप्तान पारस डोगरा यांनी संघाला नवी दिशा दिली. गतवर्षी निवृत्तीचा विचार करणाऱ्या डोगराने आणखी एक मोसम खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा संघाला मोठा फायदा झाला. यंदा ९ सामन्यांत ६०० पेक्षा अधिक धावा करत त्यांनी रणजी कारकिर्दीतील १०,००० धावांचा टप्पा गाठला. रणजी इतिहासात हा मान मिळवणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला; याआधी हा विक्रम वासिम जाफर यांच्या नावावर होता.

 


जम्मु एक्स्प्रेस’ नबीचा कहर

जम्मु एक्स्प्रेसम्हणून ओळखला जाणारा नबी याने १० सामन्यांत ६० बळी घेत गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली. उपांत्यपूर्व फेरीत प. बंगालविरुद्ध १२ बळी घेत त्याने सामना एकहाती फिरवला. गतवर्षीही त्याने बळींचे अर्धशतक पूर्ण केले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली संघाने त्याला ८ कोटी ४० लाख रुपये देऊन करारबद्ध केले आहे.

 

समद, सुनील आणि खजुरियाची भक्कम साथ

मध्यमगती गोलंदाज सुनील कुमार याने ९ सामन्यांत ३० बळी घेत नबीला उत्तम साथ दिली. मधल्या फळीत डावखुरा फलंदाज समद याने ९ सामन्यांत ७०० पेक्षा जास्त धावा फटकावत संघाचा कणा मजबूत केला; प. बंगालविरुद्धच्या सामन्यातील ८२ आणि नाबाद २७ धावा निर्णायक ठरल्या. चिवट फलंदाज शुभम खजुरिया याचाही विजयात मोठा वाटा राहिला.

 

अजय शर्मा यांचा कायापालट

६१ वर्षीय माजी रणजी कर्णधार अजय शर्मा यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारत संघाचा कायापालट केला. प्रारंभीच्या ३८ खेळाडूंमधून त्यांनी संघबांधणी केली. सहाय्यक प्रशिक्षक पी. कृष्णकुमार आणि दिशान याज्ञिक यांचीही मोठी साथ लाभली. याआधी इरफान पठाण यांचे मार्गदर्शनही संघाला मिळाले. उत्तम खेळपट्ट्या, शिस्तबद्ध सराव आणि आत्मविश्वास वृद्धी यामुळे जम्मु-काश्मिर संघाची मानसिकता बदलली.

 

संघर्षातून घडलेला विजय

प्रतिकूल हवामान परिस्थिती, पायाभूत सुविधांचा अभाव, लहरी हवामान, कडाक्याची थंडी आणि सराव करण्यासाठी चांगल्या मैदानाची वानवा, सरावासाठी मर्यादित साधने, या सर्व अडचणींवर मात करत जम्मु-काश्मिरने हे यश मिळवले. प्रतिभेला कोणत्याही सीमांमध्ये कैद करता येत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे जम्मु काश्मिर‌ संघ आहे. २०१५-१६ मध्ये जम्मु-काश्मिरने सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या ताकदवान मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवूनही फारशी दखल घेतली गेली नव्हती. गतवर्षी जम्मु काश्मिर‌ संघाला उपांत्य पुर्व फेरीत हार खावी लागली होती. यंदा मात्र तो इतिहास जम्मु काश्मिर‌ संघाने लगेचच पुसून टाकला. जम्मु-काश्मिरने यंदाच्या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

भविष्यातील दिशा

बीसीसीआय आणि जम्मु-काश्मिर सरकारचे भक्कम पाठबळ मिळाले, तर या खोऱ्यातून भारतीय संघाला दर्जेदार क्रिकेटपटू मिळतील यात शंका नाही. नबी आणि समद यांनी आयपीएलमध्येही हीच कामगिरी कायम ठेवली, तर भारतीय संघाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडणे निश्चित आहे.

 


Post a Comment

0 Comments