चारकोपमध्ये मल्लखांबाचा महाउत्सव!
चौथी ‘आरंभ स्पोर्ट्स’ स्पर्धा २१–२२ फेब्रुवारीला
४५० हून अधिक खेळाडूंची हजेरी
ताकद, संतुलन आणि परंपरेचा जल्लोष
मुंबई : कांदिवली
(पश्चिम) येथील चारकोपमध्ये आजपासून मल्लखांबाच्या कसरतींनी आसमंत दणाणणार आहे!
पारंपरिक खेळाची ताकद, लवचिकता आणि संतुलन यांचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी चौथी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा
सज्ज झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तब्बल
४५० हून अधिक खेळाडू
विविध वयोगटांतून आपली कला सादर करणार असून,
प्रेक्षकांना थरारक कसरतींचा मेजवानी मिळणार आहे.
मोरया मित्र मंडळ मैदानावर रंगणार क्रीडासोहळा
आरंभ स्पोर्ट्स आणि मोरया मित्र मंडळ
यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोरया मित्र मंडळ मैदान,
चारकोप,
कांदिवली (पश्चिम)
येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. पारंपरिक मल्लखांब खेळाचा
प्रचार-प्रसार आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेमागील
मुख्य उद्देश आहे.
मान्यवरांची उपस्थिती ठरणार आकर्षण
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रख्यात क्रीडा पोषणतज्ज्ञ
व व्याख्याता स्वेता बेसिन, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी आणि कार्यवाह आशिष देवल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच क्रीडा,
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार
आहेत.
पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा
स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ स्थानिक आमदार
संजय उपाध्याय
आणि नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. विजेत्या खेळाडूंना
गौरविण्यात येणार असून त्यांच्या कामगिरीला दाद दिली जाणार आहे.
संघटनात्मक जबाबदारी सक्षम हातात
या स्पर्धेचे आयोजन प्रमुख मंदार आंसेगावकर स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत,
तर राष्ट्रीय खेळाडू निलम राणे स्पर्धा सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली
स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
नवोदितांना नवी झेप
मल्लखांब या पारंपरिक खेळाला नवी उभारी देत नवोदित
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चारकोपमध्ये
रंगणारा हा क्रीडामहोत्सव पारंपरिक खेळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल,
यात शंका नाही.

Post a Comment
0 Comments