Type Here to Get Search Results !

युवा तायक्वांडोपटू विवांश घोषचा सुवर्णझळाळता पराक्रम! “चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत ३ सुवर्ण, २ रौप्य पदकांची दमदार कमाई


 

युवा तायक्वांडोपटू विवांश घोषचा सुवर्णझळाळता पराक्रम!

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत ३ सुवर्ण, २ रौप्य पदकांची दमदार कमाई

 

मुंबई : मुंबईच्या मरीन लाईन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात पार पडलेल्या प्रतिष्ठित चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत अवघ्या अल्पवयात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत युवा तायक्वांडोपटू विवांश घोष याने क्रीडाजगताचे लक्ष वेधून घेतले. वेग, ताकद, तंत्र आणि आत्मविश्वास यांचा अफलातून संगम साधत विवांशने या स्पर्धेत ३ सुवर्ण व २ रौप्य पदके पटकावत शानदार यशाची नोंद केली.

 

शालेय विद्यार्थी, पण आंतरराष्ट्रीय आत्मविश्वास

सध्या दादर येथील बंगाली एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये ७ वी इयत्ता शिकणारा विवांश घोष गेल्या ५ वर्षांपासून तायक्वांडोचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. वय लहान असले तरी त्याची कामगिरी प्रचंड मोठी आहे. विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व खुल्या स्पर्धांमध्ये त्याने आतापर्यंत ३० पेक्षा अधिक पदके जिंकून आपली सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली आहे.

 

ब्लॅक बेल्टसह बहुगुणी खेळाडू

तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्टधारक असलेला विवांश घोष हा केवळ एक मार्शल आर्ट्स खेळाडू नसून तो बहुगुणी खेळाडू आहे. त्याने आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत देखील आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व केले असून, मैदानी खेळांमध्येही त्याची आवड आणि तयारी तितकीच ठोस आहे.

 

घडण घडवणारी अकादमी आणि प्रशिक्षक

दादर येथील खेलो तायक्वांडो अकादमीमध्ये विवांश नियमित सराव करतो. त्याच्या यशामागे अनुभवी प्रशिक्षक राजेश मुराव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. शिस्तबद्ध सराव, तांत्रिक बारकावे आणि मानसिक तयारी यामुळे विवांशची कामगिरी दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत आहे.

 

शाळेचा अभिमान, कुटुंबाचा वारसा

विवांशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा नायडू यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. विशेष म्हणजे, भारताच्या माजी महिला कसोटीवीर व मुंबईच्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू अरुंधती घोष यांचा विवांश हा नातू आहे. क्रीडाक्षेत्राचा समृद्ध वारसा आणि नव्या पिढीची चमकदार कामगिरी यांचा सुंदर संगम विवांशच्या यशात दिसून येतो. विवांश घोषने युवा वयात मिळवलेले हे यश भविष्यातील मोठ्या क्रीडा प्रवासाची नांदी ठरेल, यात शंका नाही!

Post a Comment

0 Comments