को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत
जी एस महानगर बँकेचा
विजेतेपदावर कब्जा!
गतविजेत्या हिंदुस्थान बँकेवर ८ धावांनी मात करून
अजिंक्यपदाला गवसणी
प्रफुल पवारची अष्टपैलू कमाल
मुंबई – जबरदस्त संघर्ष, उत्कंठावर्धक क्षण आणि निर्णायक क्षणी चमकणाऱ्या अष्टपैलू
कामगिरीच्या जोरावर जी एस महानगर को-ऑप. बँकेने गतविजेत्या हिंदुस्थान को-ऑप.
बँकेवर ८ धावांनी थरारक विजय मिळवत अजिंक्यपदावर नाव कोरले!
अंतिम सामन्यात प्रफुल पवारने १७ धावा आणि अवघ्या ३ धावांत २ बळी घेत
संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मधल्या षटकांत
हिंदुस्थान बँकेची फलंदाजी कोलमडल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे
लागले. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
सलामीची सुरुवात, पण विजय जगतापने दिला धक्का
दादर-पूर्व येथील पुरंदरे स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या महानगर बँकेकडून
आदित्य सावंत (७ धावा)
आणि समीर हाडवळे (७ धावा) यांनी संयमी सुरुवात करत १७ धावांची सलामी भागीदारी उभारली. परंतु गोलंदाजीसाठी आलेल्या विजय जगतापने ८ धावांत २ बळी घेत महानगर बँकेची अवस्था ३
बाद १९ धावा अशी बिकट केली आणि हिंदुस्थान बँकेला सामन्यात वरचष्मा मिळवून दिला.
प्रफुल पवार-विलास घेमुडची निर्णायक भागीदारी
संघ अडचणीत असताना प्रफुल पवारने १७ धावा करत संयमी आणि आक्रमक खेळी साकारली,
तर विलास घेमुडने नाबाद ७ धावा करत त्याला भक्कम साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी
महत्त्वपूर्ण २५ धावांची भागीदारी उभारून संघाला संकटातून बाहेर काढले. त्यांच्या या निर्णायक
योगदानामुळे महानगर बँकेने मर्यादित ५ षटकांत ४ बाद ४४ धावा असा लढाऊ स्कोअर उभा केला आणि हिंदुस्थान बँकेसमोर
आव्हानात्मक लक्ष्य ठेवले.
कुलदीप पवार-अनिरुध्दची झुंज;
पण प्रफुल पवारने
फिरवला सामन्याचा चेहरा
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थान बँकेकडून
कुलदीप पवारने १० धावा
आणि अनिरुध्दने ७ धावा करत आक्रमक फलंदाजी केली. त्यांच्या खेळीमुळे संघाने
डावाच्या मध्यापर्यंत २ बाद ३० धावा अशी मजबूत स्थिती गाठली होती. मात्र निर्णायक क्षणी
गोलंदाजीसाठी आलेल्या प्रफुल पवारने अवघ्या ३ धावांत २ बळी घेत हिंदुस्थान बँकेचा
डाव डळमळीत केला.
त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर हिंदुस्थान बँकेची फलंदाजी
कोलमडली आणि त्यांचा संपूर्ण डाव ५ षटकांत ६ बाद ३६ धावांवर आटोपला. यामुळे महानगर बँकेने ८ धावांनी शानदार विजय मिळवत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब
केले.
३२ संघांच्या स्पर्धेत महानगर बँकेचा दबदबा
राज्यभरातील ३२ सहकारी बँकांच्या संघांनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत
जीएस महानगर को-ऑप. बँकेने
विजेतेपद पटकावत सर्वोच्च मान पटकावला, तर हिंदुस्थान को-ऑप. बँकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे
लागले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या रत्नागिरी जिल्हा बँक आणि अपना बँक
यांनी संयुक्त उपांत्य उपविजेतेपद मिळवले.
पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने रंगली स्पर्धा
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे
कार्याध्यक्ष सुनील साळवी,
सरचिटणीस नरेंद्र
सावंत, ठाणे
सरचिटणीस प्रदीप पाटील, खजिनदार प्रमोद पार्टे, तसेच जनार्दन मोरे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर आणि नितीन गवादे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments