खेळाडूंच्या यशामागचा ‘अदृश्य नायक’ – क्रीडा पत्रकार!
माजी कसोटीपटू प्रवीण
आमरे यांचे प्रांजळ मनोगत
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या करमरकर क्रिकेट टर्फचे
दिमाखदार उद्घाटन
मुंबई : एखादा खेळाडू शिखरावर पोहोचतो, त्याच्या
कामगिरीची दखल जग घेतं; पण त्या यशामागे उभे असतात काही शांत, समर्पित
आणि निष्ठावंत हात! “खेळाडूंच्या उत्कर्षात क्रीडा पत्रकारांचा वाटा खूप मोठा
आहे,” असे
ठाम आणि हृद्य उद्गार भारताचा माजी कसोटीपटू प्रवीण
आमरे यांनी काढत क्रीडा पत्रकारांप्रती कृतज्ञतेचा वर्षाव केला.
मुंबई मराठी पत्रकार संघाने उभारलेल्या ‘क्रीडा पत्रकारमहर्षी वि. वि. करमरकर
क्रिकेट टर्फ’च्या उद्घाटनप्रसंगी आमरे यांचे मनोगत उपस्थितांना भावूक करून गेले.
कृतज्ञतेची भावपूर्ण कबुली
“आज
क्रिकेटपटूंबरोबर देशातील विविध खेळांतील उच्च स्थानी असलेल्या सर्व खेळाडूंच्या
यशात क्रीडा पत्रकारांचा मोठा वाटा आहे. त्यात मी सुद्धा येतो,” असे
सांगताना प्रवीण आमरे यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातील
आठवणींना उजाळा दिला. दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियाचा महापूर नव्हता, त्या
काळात प्रिंट माध्यमातील क्रीडा पत्रकारांनी आमच्यावर लिहिलेल्या बातम्यांमुळे
आमची कामगिरी सर्वदूर पोहोचली.
गरीब घरातून आलेल्या, पण गुणवत्ता असलेल्या माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना या
प्रसिद्धीमुळे उत्तम नोकऱ्या मिळाल्या, विविध आस्थापनांमध्ये संधी मिळाली आणि आयुष्यात स्थैर्य
प्राप्त झाले. “ही मदत मी आयुष्यभर विसरणार नाही,” असे सांगत आमरे यांनी
पत्रकार संघाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे नमूद
केले.
करमरकर क्रिकेट टर्फचे उद्घाटन – एक ऐतिहासिक क्षण
मुंबईतील आझाद मैदान येथील पत्रकार भवनाच्या आवारात उभारलेल्या ‘क्रीडा
पत्रकारमहर्षी वि. वि. करमरकर क्रिकेट टर्फ’चे उद्घाटन प्रवीण
आमरे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे चिटणीस उन्मेष
खानविलकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप
चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मैदान
बचाव चळवळीचे अग्रणी ज्येष्ठ क्रीडा संघटक भास्कर सावंत, उपाध्यक्ष स्वाती
घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले आणि अजय
वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाला आजी-माजी खेळाडू, क्रीडा
संघटक, कार्यकर्ते
आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
बोलिंग मशीनचे आश्वासन आणि ११ हजारांची मदत
या निमित्ताने उन्मेष खानविलकर यांनी क्रिकेट टर्फसाठी आवश्यक
असणारी बोलिंग मशीन देण्याचे आश्वासन दिले. “क्रीडा
पत्रकार नेहमी संघटना आणि खेळाडूंच्या पाठीशी उभे असतात; आता
त्यांच्या स्वास्थासाठी मदत करण्याची जबाबदारी आमची आहे,” असे
त्यांनी स्पष्ट केले.
करमरकर ट्रस्टचे ट्रस्टी भास्कर
सावंत यांनी करमरकर यांच्या आठवणींना उजाळा देत टर्फच्या कामासाठी ११
हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक
केले.
करमरकरांची आठवण – पत्रकारितेचा प्रेरणास्त्रोत
“करमरकरांसारख्या
मित्राची जागा मी माझ्या हृदयात जपून ठेवली आहे. क्रीडा पत्रकारितेला नवा आयाम
देणाऱ्या या महर्षीची आठवण पत्रकार संघाने अशा पद्धतीने जपली, हे
मोठे काम आहे,” असे भावपूर्ण शब्दांत ज्येष्ठ पत्रकार मधुकर
भावे यांनी गौरवोद्गार काढले.
सदस्यांसाठी टर्फ मोफत; उपक्रमांची
परंपरा कायम
हे क्रिकेट टर्फ पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांसाठी मोफत
उपलब्ध करून देण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष संदीप
चव्हाण यांनी केली. कार्यवाह शैलेंद्र
शिर्के यांनी सांगितले की, संघाने यापूर्वीही अनेक उपक्रम राबवले असून पुढेही अशीच
सातत्यपूर्ण वाटचाल राहील. कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार संजय
परब यांनी केले.
फोटो कॅप्शन
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात उभारण्यात
आलेल्या क्रिकेट टर्फचे उद्घाटन प्रवीण आमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, करमरकर फाऊंडेशनचे विश्वस्त भास्कर
सावंत, अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, कार्यकारिणी सदस्य व विश्वस्त तसेच अनेक आजी-माजी खेळाडू
उपस्थित होते.
.jpeg)

Post a Comment
0 Comments