Type Here to Get Search Results !

७२वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०२६ महाराष्ट्राची दमदार घोडदौड उपांत्य फेरीत! उत्तर प्रदेशच्या धडाकेबाज कामगिरीने उलथापालथ तिसऱ्या दिवशी रंगल्या थरारक लढती विजेतेपदाच्या शर्यतीत मोठे धक्के आणि दणदणीत विजय!

 


७२वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०२६

महाराष्ट्राची दमदार घोडदौड उपांत्य फेरीत!

उत्तर प्रदेशच्या धडाकेबाज कामगिरीने उलथापालथ

तिसऱ्या दिवशी रंगल्या थरारक लढती

विजेतेपदाच्या शर्यतीत मोठे धक्के आणि दणदणीत विजय!

 

बडोदा : ७२व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कबड्डीप्रेमींना अक्षरशः थरार अनुभवायला मिळाला! काही बलाढ्य संघांना अनपेक्षित धक्के बसले, तर काहींनी दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीकत कूच केली. विशेषत: उत्तर प्रदेशने गतविजेत्या सर्व्हिसेसला ५५-५१ ने पराभूत करत मोठी उलथापालथ घडवली, तर महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर ५३-३८ असा दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. संतुलित आक्रमण, अचूक बचाव आणि संघभावनेच्या जोरावर महाराष्ट्राने सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला.

 

महाराष्ट्राची भक्कम कामगिरी – हिमाचलवर ५३-३८ विजय

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा ५३-३८ असा पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. चढाईत अजित चौहान १४ गुण आणि आदित्य शिंदे १२ गुण यांनी झंझावाती कामगिरी करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. चढाई आणि बचाव यांचा समतोल साधत महाराष्ट्राने सामना एकतर्फी केला. त्यांच्या प्रभावी चढायांमुळे हिमाचलचा बचाव सतत दबावाखाली राहिला.

 

बचावातही महाराष्ट्राने अचूक पकडी करत प्रतिस्पर्ध्यांच्या चढाया निष्फळ ठरवल्या. चढाई आणि बचाव यांचा परिपूर्ण समतोल साधत महाराष्ट्राने सामना एकतर्फी केला आणि १५ गुणांच्या फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

 

उत्तर प्रदेशची मोठी कामगिरी – सर्व्हिसेसवर ५५-५१ विजय

उपांत्यपूर्व फेरीतील सर्वात नाट्यमय सामना उत्तर प्रदेश आणि गतविजेता सर्व्हिसेस यांच्यात झाला. उत्तर प्रदेशने ५५-५१ असा थरारक विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. अर्जुन देशवाल याने तब्बल १९ गुणांची कमाई करत उत्तर प्रदेशच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या झंझावाती चढायांनी सर्व्हिसेसचा बचाव हादरवून सोडला.

 

 

तमिळनाडूची टायब्रेकरमधील सरशी – हरियाणावर मात

नॉकआऊट फेरीत आणखी एक मोठा धक्का बसला, जेव्हा तमिळनाडूने हरियाणावर टायब्रेकरमध्ये विजय मिळवला. निर्धारित वेळेत सामना ३५-३५ असा बरोबरीत सुटला होता. टायब्रेकरमध्ये तमिळनाडूने संयम राखत पुढील फेरीत प्रवेश केला.

 

चंदीगडचा दमदार विजय – मध्य प्रदेश ४५-२६ पराभूत

चंदीगडने मध्य प्रदेशवर ४५-२६ असा एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात पवन सहरावत याने १० गुणांची कमाई करत चंदीगडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

 

महाराष्ट्राची ६९-२१ ची धुलाई – पाँडिचेरी पराभूत

नॉकआऊट फेरीत महाराष्ट्राने पाँडिचेरीवर ६९-२१ असा दणदणीत विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. या सामन्यात संपूर्ण संघाने एकत्रित कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना संधीच दिली नाही.

 

हिमाचल विरुद्ध राजस्थान – ५६-५३ चा थरार

दिवसातील सर्वात रंगतदार सामना हिमाचल प्रदेश आणि राजस्थान यांच्यात झाला. शेवटपर्यंत चुरशीच्या लढतीत हिमाचल प्रदेशने ५६-५३ असा विजय मिळवला.
हिमाचलचे स्टार रेडर्स पप्पू कुमार – १५ गुण आणि मयंक सैनी – १४ गुण यांनी संघाला विजयाकडे नेले.

 

उत्तर प्रदेशचा आणखी एक मोठा विजय – जम्मू-काश्मीरवर ६५-२४ मात

उत्तर प्रदेशने आपली विजयी मालिका कायम ठेवत जम्मू-काश्मीरवर ६५-२४ असा दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात उत्तर प्रदेशने आक्रमण आणि बचाव दोन्ही विभागात वर्चस्व गाजवले.

 

सर्व्हिसेसचा गोव्यावर ५१-२२ विजय

सर्व्हिसेसने गोव्याचा ५१-२२ असा पराभव करत आपली ताकद दाखवून दिली. देवांक दलाल १० गुण यांनी आक्रमणात मोलाची कामगिरी केली, तर बचावात अंकित – ४ गुण मिळवत संघाला मजबूत आधार दिला.

 

बिहारचा यजमान गुजरातवर ३८-३४ विजय

बिहारने यजमान गुजरातचा ३८-३४ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला.

 

रेल्वेची ५७-३८ विजयाने पुढील फेरीत एंट्री

इंडियन रेल्वेने कर्नाटकवर ५७-३८ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रभावी चढाया आणि भक्कम बचाव यामुळे रेल्वेने सामना आपल्या नावावर केला.

 

पुढील लढतींची उत्सुकता

आता पुढील उपांत्यपूर्व सामन्यांत रेल्वे विरुद्ध बिहार, तसेच चंदीगड विरुद्ध तमिळनाडू या लढती रंगणार आहेत. स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, विजेतेपदासाठीची चुरस अधिक तीव्र झाली आहे. कबड्डीप्रेमींच्या नजरा आता उपांत्य फेरीकडे लागल्या आहेत.


Post a Comment

0 Comments