Type Here to Get Search Results !

एमजेएससी शालेय कॅरम स्पर्धेनिमित्त नगरसेवक यशवंत किल्लेदार यांचा सन्मान क्रीडाप्रेमी नेतृत्वाला गौरव, मोफत शालेय क्रीडा उपक्रमांना पाठिंबा


 

एमजेएससी शालेय कॅरम स्पर्धेनिमित्त नगरसेवक यशवंत किल्लेदार यांचा सन्मान

क्रीडाप्रेमी नेतृत्वाला गौरव, मोफत शालेय क्रीडा उपक्रमांना पाठिंबा

 

मुंबई : शालेय क्रीडा चळवळीला बळ देणाऱ्या आणि समाजोपयोगी उपक्रमांत अग्रभागी असलेल्या क्रीडाप्रेमी नेतृत्वाचा सन्मान म्हणजे प्रेरणादायी क्षण! माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब–एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्य स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेनिमित्त नगरसेवक यशवंत किल्लेदार यांचा सन्मानचिन्हाद्वारे गौरव करण्यात आला. हा सन्मान शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, क्लबचे पदाधिकारी सुनील पाटील महेश शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 

मोफत शालेय क्रीडा उपक्रमांना सहकार्याचा शब्द

दादर–माहीम विभागात विविध समाजोपयोगी क्षेत्रात विशेष कार्यरत असलेले कॅरमप्रेमी यशवंत किल्लेदार यांनी यावेळी आयडियल व एमजेएससी यांच्या शालेय मोफत क्रीडा उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सकारात्मक संकेत संयोजकांना दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे भविष्यात शालेय खेळाडूंना अधिक व्यापक व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

राज्यभरातील शालेय कॅरमपटूंचा दर्जेदार खेळ

नुकत्याच पार पडलेल्या एमजेएससी शालेय कॅरम स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूंंसह शालेय खेळाडूंनी सर्वांगसुंदर आणि तांत्रिकदृष्ट्या उच्च दर्जाचा खेळ सादर केला.

 

थरारक अंतिम सामना – प्रसन्न गोळेची बाजी

मुंबईचा प्रसन्न गोळे विरुद्ध जैतापूरचा आर्यन राऊत या दोन राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूंमधील एमजेएससी ट्रॉफीचा अंतिम सामना अक्षरशः अटीतटीचा ठरला. हा सामना पारितोषिक वितरक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी संपूर्णपणे पाहिला. शेवटच्या क्षणी आर्यन राऊत विजयी ठरेल असे चित्र असतानाही, आत्मविश्वासाच्या जोरावर मोक्याच्या क्षणी कठीण फटका साधत प्रसन्न गोळेने बाजी मारली आणि अजिंक्यपद पटकावले.

 

खेळाडूंना मार्गदर्शन – क्रीडाप्रेमी नेतृत्वाची भूमिका

दोन्ही खेळाडूंच्या खेळाचे समर्पक विश्लेषण करत यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्क येथील बक्षीस समारंभात उपस्थित सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी शालेय कॅरमपटूंमध्ये नवचैतन्य संचारले.

 


Post a Comment

0 Comments