Type Here to Get Search Results !

अमर हिंद मंडळ आजोजित ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धा कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक स्पर्धेला अजितदादा पवार क्रीडा नगरीत दिमाखदार प्रारंभ नेवल डॉक, बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया आणि महावितरण कंपनीची विजयी सुरवात आतिषबाजीच्या साक्षीने खो-खो महायज्ञाची सुरुवात


अमर हिंद मंडळ आजोजित ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धा

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक स्पर्धेला अजितदादा पवार क्रीडा नगरीत दिमाखदार प्रारंभ

नेवल डॉक, बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया आणि महावितरण कंपनीची विजयी सुरवात

आतिषबाजीच्या साक्षीने खो-खो महायज्ञाची सुरुवात

 


मुंबई : मुंबईतील खो-खो रसिकांसाठी पर्वणी ठरलेल्या मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ आयोजित कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेला कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत उत्साहपूर्ण वातावरणात धमाकेदार प्रारंभ झाला. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते शोभेच्या आतिषबाजीसह चषकांचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर नाणेफेक करून स्पर्धेचा अधिकृत श्रीगणेशा करण्यात आला आणि मैदानावर व्यावसायिक खो-खोचा वेगवान, चित्तथरारक आणि रोमांचक खेळ रंगू लागला. नेवल डॉक, बृहन्मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ इंडिया आणि महावितरण कंपनीने विजयी सलामी दिली. त्यावेळी अमरहिंद मंडळाचे विश्वस्त अरुण देशपांडे, दिपक पडते, सीमा कोल्हटकर, उत्कर्षा तळेकर, प्रफुल्ल पाटील, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहकार्यवाह बाळासाहेब तोरसकर, मुंबई खो-खो संघटनेचे प्र. कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई, निलेश सावंत, रोहन चव्हाण आदी पाधाधिकारी व  खो खो कार्यकर्ते उपस्थित होते. 

 


नेवल डॉकचा गंधेकर इलेक्ट्रीकल्सवर दमदार विजय

या सामन्यात गंधेकर इलेक्ट्रीकल्स प्रा. लि. ने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले; मात्र नेवल डॉकने २९–२२ असा ३.३५ मि. राखून ७ गुणांनी शानदार विजय मिळवला. विजयी नेवल डॉकच्या सार्थक जूनघरे (२.१०, नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), सुजल मोरे (२.३० मि. संरक्षण व ४ गुण), शुभम दगडे (१.५० मि. संरक्षण व १० गुण), हितेन भोईर (नाबाद २.२० मि. संरक्षण व ४ गुण), अनंत साटले (६ गुण) यांनी सलग प्रभावी कामगिरी करत विजय निश्चित केला. पराभूत गंधेकर इलेक्ट्रीकल्स प्रा. लि.च्या गौरव कुडव (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), अक्षय भोईर (१, १.१० मि. संरक्षण व १२ गुण), कुशांग वैश्य (१.३० मि. संरक्षण) यांनी जोरदार प्रतिकार केला. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंच प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.

 


बृहन्मुंबई महानगरपालिकेची रिझर्व बँक ऑफ इंडियावर मात

या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारत रिझर्व बँक ऑफ इंडियाचा ३१–२८ असा ३ गुणांनी पराभव केला. विजयी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पियुश घोलम (१.५४, १.३० मि. संरक्षण व १२ गुण), अर्जुन अनिवासे (१.२०, १.४० मि. संरक्षण व ८ गुण), संचित कंक (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), अजय राऊत (१.२० मि. संरक्षण) यांनी सलग उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. पराभूत रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या महेश भेलोंडे (१.३० मि. संरक्षण व २ गुण), सिद्धेश चोरगे (१.५०, १.५० मि. संरक्षण व ४ गुण), सुजल देव्हारे (१.२० मि. संरक्षण व ८ गुण), संदेश सपकाळ (१.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगली झुंज दिली. या सामन्यावर देवेंद्र बर्डे यांनी पंच प्रमुख म्हणून काम पाहिले.

 


बँक ऑफ इंडियाचा दत्तकृपा ट्रॅव्हल्सवर एकतर्फी विजय

या सामन्यात दत्तकृपा ट्रॅव्हल्सने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले; मात्र बँक ऑफ इंडियाने २२–१४ असा ६.३० मि. राखून ८ गुणांनी विजय मिळवला. विजयी बँक ऑफ इंडियाच्या हर्ष कामतेकर (२ मि. संरक्षण व २ गुण), जर्नादन सावंत (३ मि. संरक्षण व ४ गुण), विजय देठे (१.३५ मि. संरक्षण व ४ गुण), रामचंद्र झोरे (३.१० मि. संरक्षण), अर्पित तिवारी यांनी भक्कम खेळ करत विजय साकारला. पराभूत दत्तकृपा ट्रॅव्हल्सच्या निमिश कालप (१.२४ मि. संरक्षण व ४ गुण), शुभम शिगवण (१.१०, १.१० मि. संरक्षण व २ गुण), यश दुर्गावले (१.४० मि. संरक्षण), प्रथमेश कदम (२ गुण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या सामन्यावर विराज कोठमकर यांनी पंच प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.

 


महावितरण कंपनीचा डी. डी. अॅडव्हर्टायझिंगवर विजयी झंझावात

या सामन्यात डी. डी. अॅडव्हर्टायझिंगने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले; मात्र महावितरण कंपनीने २४–१८ असा ५.३० मि. राखून ६ गुणांनी विजय मिळवत दमदार सुरुवात केली. विजयी महावितरण कंपनीच्या प्रतिक धणिकर (२.३२ मि. संरक्षण व २ गुण), ऋषिकेश मुर्चावडे (१.४० मि. संरक्षण व ६ गुण), प्रतिक वाईकर (१.२० मि. संरक्षण व ५ गुण), साहिल खोपाडे (२.५५ मि. संरक्षण) यांनी सलग प्रभावी कामगिरी करत सामना जिंकला. पराभूत डी. डी. अॅडव्हर्टायझिंगच्या राकेश चौधरी (४ गुण), सुरज वैश्य (१ मि. संरक्षण व २ गुण), यश बोरावडे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण), साहिल जामसुतकर (१.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगली लढत दिली. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंच प्रमुख म्हणून काम पाहिले.

 

स्पर्धेची रंगत वाढली : व्यावसायिक खो-खोचा नवा अध्याय सुरू

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेच्या उद्घाटन दिवसापासूनच व्यावसायिक दर्जाचा वेगवान आणि थरारक खेळ पाहायला मिळत असून, प्रत्येक संघ विजेतेपदासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. अजितदादा पवार क्रीडा नगरीत रंगणारी ही स्पर्धा खो-खोच्या इतिहासात नवा सुवर्णअध्याय लिहिण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे.


Post a Comment

0 Comments