Type Here to Get Search Results !

डेरवणमध्ये ‘खेळाचा इतिहास’ केला जिवंत! १२ व्या यूथ गेम्समध्ये माहितीपूर्ण क्रीडा प्रदर्शन खो-खोच्या गौरवशाली प्रवासाने खेळाडू भारावले केवळ स्पर्धा नव्हे; संस्कृतीचा उत्सव!


डेरवणमध्ये ‘खेळाचा इतिहास’ केला जिवंत!

१२ व्या यूथ गेम्समध्ये माहितीपूर्ण क्रीडा प्रदर्शन

खो-खोच्या गौरवशाली प्रवासाने खेळाडू भारावले

केवळ स्पर्धा नव्हे; संस्कृतीचा उत्सव!

 

चिपळूण : यूथ गेम्स म्हणजे केवळ मैदानावरील झुंज, पदकांची चुरस आणि सरावाची धडपड एवढ्यावरच मर्यादित नसून खेळाच्या मुळाशी नेणारे, त्याचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा उलगडून दाखवणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे डेरवणमध्ये पुन्हा अधोरेखित झाले. क्रीडांगणासोबतच ज्ञानांगण उभे करत यंदाही भरवण्यात आलेल्या विशेष माहितीपूर्ण प्रदर्शनाने विद्यार्थी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

 

खो-खोचा प्रेरणादायी आणि गौरवशाली प्रवास

यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले अस्सल भारतीय खेळ खो-खोचा सविस्तर इतिहास. नियमावलीपासून ते उगम, पारंपरिक वारसा, कौशल्यांची शिस्त आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला ओळख मिळवून देणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला.

 

जुनी छायाचित्रे, महत्त्वाचे टप्पे आणि उल्लेखनीय विक्रम पाहताना अनेक उदयोन्मुख खेळाडू अक्षरशः भारावून गेले. आपल्या आवडत्या खेळाची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याची जाणीव त्यांना नव्याने झाली.

 

चित्रफितींतून तांत्रिक बारकावे

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ माहितीफलकांपुरते ते मर्यादित न ठेवता चित्रफितींच्या माध्यमातून खेळाडूंचे प्रबोधन करण्यात आले. इतिहास, तंत्र, बदलती आंतरराष्ट्रीय नियमावली आणि खेळातील आधुनिकता यांचा समन्वय दाखवणाऱ्या या सादरीकरणामुळे खेळाडूंना समज अधिक सुलभ झाली.

 

यापूर्वीच्या यूथ गेम्समध्ये जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि स्विमिंग या खेळांची अशीच अभ्यासपूर्ण माहिती सादर करण्यात आली होती. त्या माध्यमातून खेळाडूंना तांत्रिक प्रगल्भता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य आत्मसात करण्याची दिशा मिळाली होती.

 

वैचारिक समृद्धीचा उपक्रम

केवळ स्पर्धांचे आयोजन न करता खेळाडूंना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा उद्देश या प्रदर्शनामागे आहे. खेळाचा प्रवास, त्यामागील संस्कृती, मूल्ये आणि समाजाशी असलेले नाते जाणून घेण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे.

अभ्यासपूर्ण प्रदर्शन’ ही आता यूथ गेम्सची वेगळी आणि सकारात्मक ओळख बनली असून यंदाही प्रदर्शनाला मिळालेली खेळाडूंची मोठी गर्दी याचे प्रत्यंतर ठरली आहे.

 

प्रेरणेचा स्रोत : विनोद मयेकर

प्रतिक्रिया देताना खो-खो मार्गदर्शक विनोद मयेकर म्हणाले, “मैदानावर खेळताना सराव आणि तंत्रावर लक्ष केंद्रित करावे लागते. मात्र अशा प्रदर्शनांमुळे खेळाचा इतिहास, संस्कृती आणि मूल्ये समजतात. खो-खोसारख्या भारतीय खेळाचे बारकावे जवळून पाहिल्यानंतर सहभागी सर्व खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.”

 

सर्वांगीण विकासाची दिशा

यूथ गेम्समधील हे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी प्रदर्शन खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. केवळ पदकांसाठी नव्हे, तर खेळाबद्दल अभिमान आणि जाणीव दृढ करण्यासाठी हा उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहे. डेरवणच्या या क्रीडांगणात मैदानावरील झुंज जितकी रंगतदार आहे, तितकीच ज्ञानाची ही प्रदर्शनीही खेळाडूंच्या मनावर कायमस्वरूपी छाप उमटवत आहे!


Post a Comment

0 Comments