Type Here to Get Search Results !

भैरवनाथचा दमदार डंका गुड मॉर्निंग स्पोर्टस्‌चा जल्लोष! स्पर्श फाउंडेशन आयोजित “स्वर्गीय सामानाधिकारी स्मृती” कबड्डी स्पर्धा २०२६ रंगतदार; तृतीय श्रेणी पुरुषांत भैरवनाथ विजेता तर १४ वर्षांखालील गटात गुड मॉर्निंगचा चषकावर कब्जा मॅरेथॉन मैदानावर कबड्डीचा थरार; विजयांची आतषबाजी!


भैरवनाथचा दमदार डंका
गुड मॉर्निंग स्पोर्टस्‌चा जल्लोष!

स्पर्श फाउंडेशन आयोजित “स्वर्गीय सामानाधिकारी स्मृती” कबड्डी स्पर्धा २०२६ रंगतदार;

तृतीय श्रेणी पुरुषांत भैरवनाथ विजेता तर १४ वर्षांखालील गटात गुड मॉर्निंगचा चषकावर कब्जा

मॅरेथॉन मैदानावर कबड्डीचा थरार; विजयांची आतषबाजी!

 

मुंबई : स्पर्श फाउंडेशन आयोजित स्वर्गीय सामानाधिकारी स्मृती कबड्डी स्पर्धा २०२६ मध्ये लोअर परेल येथील मॅरेथॉन मैदान कबड्डीच्या जल्लोषाने दणाणून गेले! तृतीय श्रेणी पुरुष गटात भैरवनाथ मंडळाने दिमाखात विजेतेपद पटकावत “स्वर्गीय सामानाधिकारी चषकआपल्या नावावर केला, तर १४ वर्षांखालील गटात गुड मॉर्निंग स्पोर्टस् संघाने अप्रतिम खेळ करत चषकावर आपली मोहोर उमटवली.

 

तृतीय श्रेणी पुरुष गट – भैरवनाथचा ३२-०६ धडाका!

अंतिम सामन्यात भैरवनाथ मंडळाने श्री दत्त मंडळावर ३२-०६ अशी एकतर्फी मात करत विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासून आक्रमक चढाया करत लोण देत भैरवनाथने विश्रांतीला १५-०५ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही त्याच जोशात खेळ करत प्रतिस्पर्ध्यांचे पूर्ण नामोहरण केले.

 

या विजयात तन्वय कदम आणि सतीश जाधव यांच्या चढाई-पकडीच्या झंझावाती खेळाने निर्णायक भूमिका बजावली. श्री दत्तकडून शिवम रायभान यांनी चांगली झुंज दिली; मात्र संघाला विजयापर्यंत नेणे शक्य झाले नाही.

 

वैयक्तिक सन्मान – तन्मय कदम सर्वोत्तम!

तृतीय श्रेणी गटात तन्मय कदम (भैरवनाथ) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. उत्कृष्ट पकडीसाठी सतीश जाधव (भैरवनाथ) तर उत्कृष्ट चढाईसाठी शिवम रायभान (श्री दत्त) यांना सन्मानित करण्यात आले. सर्व विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

 


१४ वर्षांखालील गट – गुड मॉर्निंगचा ४७-२८ विजय

१४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्टस् संघाने श्री संस्कृती मंडळावर ४७-२८ अशी दणदणीत मात केली. सार्थ बागडे, शिव शर्मा आणि श्रेयस यादव यांच्या चतुरस्त्र आणि अचूक खेळामुळे गुड मॉर्निंगने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राखली. संस्कृतीकडून सचिन तिवारी यांनी एकाकी झुंज देत संघाचा मान राखण्याचा प्रयत्न केला.

 

युवा खेळाडूंचा गौरव

१४ वर्षांखालील गटात सार्थक बागडे (गुड मॉर्निंग) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. उत्कृष्ट पकडीसाठी शिव शर्मा (गुड मॉर्निंग) तर उत्कृष्ट चढाईसाठी सचिन तिवारी (संस्कृती) यांना सन्मानित करण्यात आले. सर्व मानकऱ्यांना चषक प्रदान करून गौरविण्यात आले.


Post a Comment

0 Comments