Type Here to Get Search Results !

मुंबईत रंगणार ‘पिळदार’ थरार! १३ मार्चला होणार ‘मुंबई श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धा मालाडच्या दीनदयाळ उपाध्याय उद्यानात स्नायूंचा महासंग्राम पुरुष-महिला गटांसह ‘मेन्स फिजिक’चेही विशेष आकर्षण मुंबई होणार शरीरसौष्ठवाच्या महायुद्धासाठी सज्ज



 


मुंबईत रंगणार ‘पिळदार’ थरार!

१३ मार्चला होणार ‘मुंबई श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धा

मालाडच्या दीनदयाळ उपाध्याय उद्यानात स्नायूंचा महासंग्राम

पुरुष-महिला गटांसह ‘मेन्स फिजिक’चेही विशेष आकर्षण

मुंबई होणार शरीरसौष्ठवाच्या महायुद्धासाठी सज्ज

 

मुंबई : मुंबईतील शरीरसौष्ठवविश्व पुन्हा एकदा उत्साहाने धडधडू लागले आहे! पीळदार स्नायू, दमदार पोजिंग आणि कडवी स्पर्धा यांचा संगम असलेली प्रतिष्ठेची मुंबई श्री २०२६’ जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या १३ मार्च २०२६ रोजी मालाड (पूर्व) येथील पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान (कासम बाग), जय भवानी नगर येथे रंगणार आहे. मुंबईतील व्यायामशाळा, प्रशिक्षक आणि शरीरसौष्ठवपटूंमध्ये या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता असून, यंदाचा सोहळा अधिक भव्य आणि दमदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

मालाडमध्ये शरीरसौष्ठवाचा महाकुंभ

शरीरसौष्ठवाचा हा प्रतिष्ठेचा सोहळा सायंकाळी ४:०० वाजता सुरू होणार असून, मालाडच्या पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानात मुंबईभरातील ताकदवान शरीरसौष्ठवपटू एकत्र येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो क्रीडाप्रेमी या स्पर्धेला उपस्थित राहून पीळदार स्नायूंचा थरार अनुभवणार आहेत.

 

विविध वजनी गटांत दमदार लढती

मुंबई श्री २०२६स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांचा समावेश आहे. पुरुषांच्या गटात ५५ किलोपासून ते ८५ किलोवरील अशा एकूण ८ वजनी गटांमध्ये खेळाडूंची जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. यासोबतच महिलांसाठी ‘ओपन ग्रुप’ आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली मेन्स फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप’ ही स्पर्धेची खास आकर्षणे ठरणार आहेत.

 

नोंदणी व वजन तपासणीची माहिती

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी १३ मार्च रोजीच सकाळी ११:०० ते दुपारी २:०० या वेळेत स्पर्धास्थळी वजन तपासणी आणि नोंदणी केली जाणार आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे: शरीरसौष्ठव गट:,००० व फिटनेस फिजिक गट:,५००

 

आयोजनासाठी अनुभवी नेतृत्व

या स्पर्धेचे आयोजन ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अजय खानविलकर (अध्यक्ष, GBBBA), राजेश सावंत (सरचिटणीस, GBBBA), किट्टी फनसेका (अध्यक्ष, MSBBFA) आणि विशाल परब (सरचिटणीस, MSBBFA) यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी सुरू आहे.

 

खेळाडूंना आयोजकांचे आवाहन

मुंबई आणि उपनगरातील सर्व व्यायामशाळांनी तसेच नवोदित व अनुभवी शरीरसौष्ठवपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुंबई श्री २०२६’ स्पर्धेला भव्य यश मिळवून द्यावे आणि मुंबईच्या शरीरसौष्ठव परंपरेला अधिक बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

मुंबईचा स्नायूशक्तीचा उत्सव पुन्हा एकदा रंगणार असून, १३ मार्च रोजी मालाडमध्ये शरीरसौष्ठवाचा खरा जल्लोष पाहायला मिळणार आहे!


Post a Comment

0 Comments