सुरेखा कडवे स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत हिरण्मयी, अथर्व, निधीशचा दणदणीत विजय
जलद बुद्धिबळाच्या पटावर बालपटूंचा डावपेचांचा
थरार विजेत्यांसह मातांचाही ‘आदर्श महिला’ पुरस्काराने गौरव
बालबुद्धिबळपटूंचा पटावर डावपेचांचा जल्लोष
मुंबई : जलद बुद्धिबळाच्या पटावर चाललेल्या चुरशीच्या
डावपेचांमध्ये प्रतिभावान बालपटूंनी आपली बुद्धिमत्ता आणि संयमाची ताकद दाखवून
दिली. ज्येष्ठ शिक्षिका स्व. सुरेखा कडवे स्मृती शालेय बुद्धिबळ स्पर्धेत १३ वर्षाखालील
गटात हिरण्मयी कुळकर्णी, १० वर्षाखालील गटात अथर्व मुळीक आणि ७ वर्षाखालील गटात निधीश खोपकर यांनी शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले. या
स्पर्धेत विजेत्यांच्या मातांचाही ‘आदर्श महिला पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला, ज्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य अधिक
अर्थपूर्ण ठरले.
निर्णायक फेरीत हिरण्मयीचा डावपेचांचा कमाल बचाव
स्पर्धेच्या निर्णायक ५ व्या साखळी फेरीत पहिल्या पटावर जी. क्वाड्रस यांनी स्कॉच ओपनिंगचा प्रभावी प्रयोग करत हिरण्मयी कुळकर्णीच्या राजावर सुरुवातीपासूनच जोरदार हल्ले चढवले. मात्र संयम
राखत अचूक बचाव तंत्र आणि सूक्ष्म डावपेच रचत अपराजित हिरण्मयीने २८ व्या मिनिटाला बाजी पलटवत
विजय निश्चित केला. या विजयामुळे तिने १३ वर्षाखालील गटात विजेतेपदावर
शिक्कामोर्तब केले.
१३ वर्षाखालील गटात हिरण्मयी आणि गोकर्णची बाजी
आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, आरएमएमएस आणि मुंबई बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेत १३
वर्षाखालील गटात मुलींमध्ये हिरण्मयी कुळकर्णी (४.५ गुण) हिने प्रथम
क्रमांक पटकावला. जी. क्वाड्रस (३ गुण) हिने द्वितीय तर साईशा मुळे (२.५ गुण) हिने तृतीय क्रमांक मिळवला.
मुलांच्या गटात गोकर्ण औटी (४ गुण) प्रथम, प्रणव जैन (३.५ गुण) द्वितीय आणि अर्णव जगताप (३ गुण) तृतीय ठरले.
१० वर्षाखालील गटात अथर्वचा अचूक डाव
१० वर्षाखालील गटात मुलींमध्ये आध्या पाठक (४ गुण) हिने पहिला क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरी
केली. साध्या जाधव (३ गुण) हिने द्वितीय तर विधी येसणे (३ गुण) हिने तृतीय स्थान मिळवले.
मुलांच्या गटात अथर्व मुळीक (५ गुण) याने सर्व सामने जिंकत दणदणीत विजेतेपद मिळवले. कैवल्य परब (४
गुण) द्वितीय तर अर्णव शेटे (३ गुण) तृतीय ठरले.
७ वर्षाखालील गटात निधीशचा शानदार खेळ
७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये मिर्या तिवारी (४ गुण) हिने प्रथम, मनस्वी पाटील (४ गुण) द्वितीय आणि पेहेर शाह (३ गुण) तृतीय क्रमांक मिळवला.
मुलांच्या गटात निधीश खोपकर (५ गुण) याने प्रभावी खेळ करत विजेतेपद पटकावले. आरुष नेवस्कर
(२.५ गुण) द्वितीय आणि सार्थ शाह (२.५ गुण) तृतीय ठरले.
विजेत्यांसह मातांचाही गौरव
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी
गोविंदराव मोहिते, मंगेश चिंदरकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख
उपस्थितीत विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त विजेत्या
खेळाडूंच्या मातांचा ‘आदर्श महिला पुरस्कार’ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

Post a Comment
0 Comments