Type Here to Get Search Results !

नूतन विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न सुवर्ण महोत्सवी वर्षात विद्यार्थ्यांचा क्रीडोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत लहान खेळाडूंचा गौरव सुवर्ण महोत्सवी वर्षात क्रीडा सोहळ्याचा जल्लोष

 


नूतन विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सुवर्ण महोत्सवी वर्षात विद्यार्थ्यांचा क्रीडोत्सव 

मान्यवरांच्या उपस्थितीत लहान खेळाडूंचा गौरव

सुवर्ण महोत्सवी वर्षात क्रीडा सोहळ्याचा जल्लोष

 

मुंबई : मुंबईतील महाराष्ट्र मंडळ (भाभा अणुसंशोधन केंद्र) शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि. १२ मार्च २०२६ रोजी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या सोहळ्याने लहान खेळाडूंमध्ये नवा उत्साह निर्माण केला आणि संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने दुमदुमून गेला.

 

क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती

या सोहळ्यास राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीणजी सावंत, राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे आणि कबड्डी प्रशिक्षक नितीनजी पवार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. लेझीम आणि ढोल पथकाच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुचिता पवार आणि ज्येष्ठ शिक्षिका संध्या चंदनशिवे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

 

विद्यार्थ्यांचे थरारक क्रीडा सादरीकरण

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी साहित्य व्यायामाचे विविध प्रकार तसेच मानवी मनोऱ्यांचे चित्तथरारक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यांच्या शिस्तबद्ध हालचाली आणि समन्वयाने मैदानावर उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.

 

मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

यावेळी प्रवीणजी सावंत यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांची आवड जोपासण्याचे आवाहन केले. इंद्रजीत मोरे यांनी उत्तम खेळाडू घडवण्यासाठी बालपणापासूनच व्यायामाची सवय आवश्यक असल्याचे सांगितले. तर नितीन पवार यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत बक्षीस हे नेहमीच प्रेरणादायी असते” असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

 

आदर्श खेळाडूंचा गौरव

या सोहळ्यात कु. हर्ष कदम आणि कु. समृद्धी वाक्षे या विद्यार्थ्यांना आदर्श खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

 

प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता

समारोप प्रसंगी मुख्याध्यापिका सुचिता पवार यांनी लहरोंसे डरकर नौका पार नही होती” या प्रेरणादायी ओळींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा संदेश दिला. अखेरीस वंदे मातरम् या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सांगता झाली.


Post a Comment

0 Comments