Type Here to Get Search Results !

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा – २०२६ महिलांत होतकरू (अ) आणि जय भारत स्पोर्टस् उपांत्य फेरीत खारलँड मैदानावर रंगली चुरशीची लढत ठाण्यात कबड्डीचा जोरदार थरार

 


ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा – २०२६

महिलांत होतकरू (अ) आणि जय भारत स्पोर्टस् उपांत्य फेरीत 

खारलँड मैदानावर रंगली चुरशीची लढत

ठाण्यात कबड्डीचा जोरदार थरार

 

ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने आणि ऍडव्होकेट सौ. पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा – २०२६ मध्ये महिलांच्या गटात चुरशीचे सामने रंगले. कळवा, खारेगाव, ठाणे (प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कूलसमोरील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत होतकरू – अ आणि जय भारत स्पोर्टस् या संघांनी दमदार खेळ करत उपांत्य फेरीत धडक दिली.

 

होतकरू – अ चा ४२–२४ असा दमदार विजय

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात होतकरू – अ संघाने समर्थ मंडळाचा ४२–२४ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अत्यंत चुरशीच्या पूर्वार्धात होतकरूकडे २१–१७ अशी आघाडी होती. उत्तरार्धात मात्र २ लोण देत त्यांनी सामना आपल्या बाजूने झुकवला. वेदिका वावेकर आणि रिया पाटकर यांच्या झंझावाती चढाया तसेच श्रुती मेने हिच्या भक्कम बचावामुळे होतकरूने हा विजय मिळवला. समर्थकडून शरयू सानप आणि प्रतिक्षा बनसोडे यांनी पूर्वार्धात तोडीसतोड झुंज दिली; मात्र उत्तरार्धात त्यांचा खेळ मंदावला.

 

जय भारत स्पोर्टस् ची २६–१७ सरशी

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जय भारत स्पोर्टस् संघाने नव तरुण मंडळाचे आव्हान २६–१७ असे परतवून लावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात तेजश्री पाटेकर, श्रेया गावडे आणि समृद्धी महागडे यांच्या चढाई व पकडीच्या प्रभावी खेळामुळे जय भारतने लोण देत १६–०४ अशी मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वैभवी कासार आणि रिबीका गावीत यांनी नव तरुणकडून जोरदार प्रयत्न करत सामन्यात रंग भरला, परंतु जय भारतचा विजय रोखण्यात त्या अपयशी ठरल्या.

 

इतर सामन्यांचे निकाल

इतर सामन्यांत ओम् वर्तकनगर संघाने छत्रपती शिवाजी, डोंबिवलीवर ४१–१८ असा विजय मिळवला. रा. फ. नाईक संघाने संघर्ष मंडळाला २६–२४ अशा चुरशीच्या लढतीत नमवले, तर ज्ञानशक्ती युवा संघाने अश्वमेघ स्पोर्टस्वर ३२–१७ अशी सरशी मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

 


पुरुष गटात गोल्डन, भाऊ, श्री विठ्ठल आणि सोनदेवी पुढे

पुरुषांच्या पहिल्या फेरीत गोल्डन स्पोर्टस् संघाने एकता संघावर २६–२४ असा निसटता विजय मिळवला. भाऊ स्पोर्टस्ने मातृभूमीला २३–१९ असे पराभूत केले. श्री विठ्ठल संघाने राज मंडळावर ३८–१२ असा दणदणीत विजय मिळवला, तर सोनदेवी मंडळाने भारत स्पोर्टस्वर ३४–२५ अशी मात करत दुसरी फेरी गाठली.

 

स्पर्धेची रंगत वाढली

ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या संघांच्या दमदार कामगिरीमुळे स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील सामन्यांमध्ये उपांत्य फेरीच्या लढती अधिकच थरारक ठरणार असून कबड्डीप्रेमींचे लक्ष आता या निर्णायक टप्प्याकडे लागले आहे.


Post a Comment

0 Comments