Type Here to Get Search Results !

जय बजरंग-वाशिंदचा दबदबा ओम् वर्तकनगर महिला गटात चमकले, ग्रीफिन्स जिमखाना कुमार गटाचे सम्राट! ठाणे जिल्हा कबड्डी स्पर्धेत तिन्ही गटात दमदार सामने खेळाडूंच्या तुफानी कामगिरीने रंगली अंतिम फेरी विजेतेपदाचा थरारक क्षण : जय बजरंगचा दमदार जलवा

 


जय बजरंग-वाशिंदचा दबदबा

ओम् वर्तकनगर महिला गटात चमकले, ग्रीफिन्स जिमखाना कुमार गटाचे सम्राट!

ठाणे जिल्हा कबड्डी स्पर्धेत तिन्ही गटात दमदार सामने खेळाडूंच्या तुफानी कामगिरीने रंगली अंतिम फेरी

विजेतेपदाचा थरारक क्षण : जय बजरंगचा दमदार जलवा


ठाणे : ठाण्यातील खारलँड मैदानावर रंगलेल्या “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यांनी अक्षरशः थरार निर्माण केला आणि जय बजरंग-वाशिंद संघाने पुरुष गटात शानदार विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. काल्हेरच्या जय हनुमान संघावर ३५-१७ अशी मात करत जय बजरंगने आपली ताकद सिद्ध केली. पहिल्या डावात १३-१३ अशी बरोबरी असताना उत्तरार्धात टॉप गिअर टाकत २ लोण देत सामना एकतर्फी केला. असलम इनामदार आणि अतुल देसले यांच्या भन्नाट खेळाने विजयावर शिक्कामोर्तब झाले, तर गौरव पाटील आणि हर्ष भोईर यांचा प्रभाव उत्तरार्धात कमी पडला.

 

महिला गटात ओम् वर्तकनगरची एकहाती सत्ता

महिला गटाच्या अंतिम सामन्यात ओम् वर्तकनगर संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत जय भारत स्पोर्टस् वर ३२-१८ अशी मात केली. पहिल्याच डावात लोण देत वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या वर्तकनगरने विश्रांतीला १६-०९ अशी आघाडी घेतली आणि दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत सामना सहज आपल्या खिशात टाकला. वैष्णवी साळुंखे हिच्या अचूक चढाया, तसेच मनीषा जैसवाल आणि पूर्वा इंगावले यांच्या भक्कम बचावामुळे हा विजय शक्य झाला. श्रेया गावंड, ज्ञानेश्वरी कोकणे, तेजस्वी पाटेकर यांचा जय भारतकडून प्रयत्न अपुरा ठरला.

 

कुमार गटात ग्रीफिन्स जिमखानाचा दबदबा

कुमार गटाच्या अंतिम लढतीत ग्रीफिन्स जिमखाना संघाने श्री स्वामी समर्थ संघावर ४०-२७ अशी प्रभावी मात करत विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत ग्रीफिन्सने पहिल्याच डावात २ लोण देत २३-१३ अशी आघाडी घेत विजय निश्चित केला. दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. मनीष धनावडे, आदित्य पिलाणे, वेदान्त ढमाले यांच्या चतुरस्त्र खेळाने संघाला विजय मिळवून दिला. विवेक शिंदे आणि विशाल सिंग यांनी चांगला प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला.

 


स्पर्धेचा उत्कर्षबिंदू : खेळाडूंच्या कामगिरीने रंगली मैफल

या स्पर्धेत सर्व गटांमध्ये खेळाडूंनी चढाई आणि पकडीचे उत्कृष्ट कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. जय बजरंग-वाशिंद, ओम् वर्तकनगर आणि ग्रीफिन्स जिमखाना या संघांनी आपल्या सर्वांगीण कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटवला. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले असून भविष्यातील स्टार खेळाडूंची चाहूलही या स्पर्धेतून दिसून आली.


Post a Comment

0 Comments