Type Here to Get Search Results !

लीलावती हॉस्पिटलची उपांत्य फेरीत दिमाखदार एन्ट्री आत्माराम मोरे स्मृती स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक! राहुल जांभळेची तुफानी ६४ धावा सोमैया हॉस्पिटलचाही शानदार विजय

 


लीलावती हॉस्पिटलची उपांत्य फेरीत दिमाखदार एन्ट्री

आत्माराम मोरे स्मृती स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक!

राहुल जांभळेची तुफानी ६४ धावा

सोमैया हॉस्पिटलचाही शानदार विजय

 

मुंबई : चौकार-षटकारांचा वर्षाव, आक्रमक फलंदाजी आणि निर्णायक गोलंदाजीच्या जोरावर रंगलेल्या आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लीलावती हॉस्पिटल संघाने दमदार कामगिरी करत बलाढ्य केडीए हॉस्पिटल-अंधेरी संघावर ७ गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यातील रोमांचक लढतीमुळे प्रेक्षकांना थरारक क्रिकेटचा आनंद मिळाला.

 

केडीए हॉस्पिटलची दमदार सुरुवात; १५८ धावांचा भक्कम टप्पा :

शिवाजी पार्क येथील बीएमसी खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना केडीए हॉस्पिटल संघाने २० षटकांत ६ बाद १५८ धावा उभारल्या. अॅलन गावद्या (३६ चेंडूत ६२ धावा) याने चौकार-षटकारांची आतषबाजी करत डावाला गती दिली. त्याला उत्तम साथ देताना अलकेत तांडेल (३२ चेंडूत ३३ धावा) आणि सुरज जयस्वाल (२२ चेंडूत ३४ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजीत स्वकीत पांचाळ (३ बळी) आणि जगदीश कोठारे (२ बळी) यांनी प्रभावी मारा केला.

 

राहुल जांभळेचा तुफानी शो; लीलावतीचा सहज विजय :

१५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीला मनोहर पाटेकर (१३ चेंडूत १३ धावा) धावचीत झाला. मात्र त्यानंतर राहुल जांभळे (३९ चेंडूत ६४ धावा) याने तडाखेबंद फलंदाजी करत सामन्याचे चित्र पालटले. त्याला साथ देताना संदीप कणसे (३७ चेंडूत नाबाद ३९ धावा) आणि संदेश पंधेरे (१३ चेंडूत नाबाद २२ धावा) यांनी आक्रमक खेळी करत १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा करत विजय निश्चित केला.

 

उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान; मान्यवरांची उपस्थिती :

या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राहुल जांभळे आणि अॅलन गावद्या यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अरुण माने, प्रदीप क्षीरसागर, मनोहर पाटेकर, श्रीकांत दुधवडकर, भरत पेडणेकर, चंद्रकांत करंगुटकर, रुपेश कोंडाळकर तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण उपस्थित होते.

 

सोमैया हॉस्पिटलचा विजय; प्रकाश पुजारीची अर्धशतकी खेळी :

दुसऱ्या सामन्यात सोमैया हॉस्पिटल संघाने सायन हॉस्पिटल संघावर ३५ धावांनी विजय मिळवला. प्रकाश पुजारी (२९ चेंडूत ५७ धावा) आणि दर्शन गुरव (३९ चेंडूत ४९ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे सोमैयाने मजबूत धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात संभाजी थोरात (४० चेंडूत ४२ धावा) आणि निलेश चव्हाण (१२ चेंडूत नाबाद २० धावा) यांनी प्रयत्न केले, मात्र सायन संघाला १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

 


Post a Comment

0 Comments