Type Here to Get Search Results !

मंगलाताई अडसूळ स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत हिरण्मयी कुळकर्णीचे दुहेरी अजिंक्यपद १४ वर्षाखालील गटात सर्व ५ सामने जिंकत विजेतेपद १३ वर्षाखालील गटातही अपराजित कामगिरी बुद्धिबळाच्या पटावर हिरण्मयीची दुहेरी बाजी

 


मंगलाताई अडसूळ स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत हिरण्मयी कुळकर्णीचे दुहेरी अजिंक्यपद

१४ वर्षाखालील गटात सर्व ५ सामने जिंकत विजेतेपद 

१३ वर्षाखालील गटातही अपराजित कामगिरी

बुद्धिबळाच्या पटावर हिरण्मयीची दुहेरी बाजी

 

मुंबई : बुद्धिबळाच्या पटावर अचूक डावपेच, संयम आणि अप्रतिम बचाव तंत्राचा संगम घडवत हिरण्मयी कुळकर्णी हिने शानदार खेळ करत स्व. मंगलाताई अडसूळ स्मृती चषक १४ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत सर्व ५ साखळी सामने जिंकून विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तिने १३ वर्षाखालील गटातही अपराजित राहून दुहेरी अजिंक्यपदावर आपले नाव कोरले, त्यामुळे स्पर्धेत तिच्या दमदार खेळाची विशेष चर्चा रंगली.

 

निर्णायक फेरीत अथर्व दाभोळकरवर मात

स्पर्धेच्या निर्णायक ५ व्या साखळी फेरीत पहिल्या पटावर हिरण्मयी कुळकर्णी आणि अथर्व दाभोळकर यांच्यात चुरशीची लढत रंगली. या सामन्यात अचूक डावपेच रचत हिरण्मयीने अथर्वच्या राजाला २६ व्या मिनिटाला शह देत सामना जिंकला आणि स्पर्धेतील सर्वाधिक पाचवा गुण मिळवत विजेतेपद निश्चित केले.

 

१४ वर्षाखालील गटात हिरण्मयी व गोकर्ण अव्वल

परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात हिरण्मयी कुळकर्णी (५ गुण) प्रथम, मानस्वी शिरसाट (२ गुण) द्वितीय आणि आराध्या महाडिक (२ गुण) तृतीय ठरल्या.

मुलांच्या गटात गोकर्ण औटी (४ गुण) प्रथम, कार्तिकेय सावंत (४ गुण) द्वितीय आणि विरेन चेट्टी (३ गुण) तृतीय क्रमांकावर राहिले.

 

११ वर्षाखालील गटात जुई आणि प्रणीलची बाजी

११ वर्षाखालील मुलींच्या गटात जुई गदाडे (३ गुण) हिने प्रथम क्रमांक मिळवला. अनिश्का बियाणी (३ गुण) द्वितीय आणि शानवी जगताप (२ गुण) तृतीय ठरल्या.

मुलांच्या गटात प्रणील मुजुमदार (४ गुण) प्रथम, जितेज गाडगे (४ गुण) द्वितीय आणि आयांश पाटील (३.५ गुण) तृतीय ठरले.

 

८ वर्षाखालील गटात साध्या व मोहित अव्वल

८ वर्षाखालील मुलींच्या गटात साध्या जाधव (४ गुण) हिने पहिला क्रमांक पटकावला. रितिका गेडाम (२.५ गुण) द्वितीय ठरली. मुलांच्या गटात मोहित सावंत (४ गुण) प्रथम, साहस जाधव (४ गुण) द्वितीय आणि स्मित लोके (३ गुण) तृतीय ठरले.

 

विजेत्यांसह मातांचाही सन्मान

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई आणि मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात क्रीडापटू प्रमोद पार्टे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे विजेत्या खेळाडूंच्या मातांचाही सन्मान करण्यात आला.

 

फिडे गुणांकित खेळाडूंनी स्पर्धेत आणली रंगत

या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटूंनी दर्जेदार खेळ सादर करत स्पर्धेला मोठी रंगत आणली, त्यामुळे प्रत्येक फेरीत प्रेक्षकांना चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.


Post a Comment

0 Comments