आंतर कॉलेज तायक्वांडो स्पर्धेत खालसा कॉलेजचा
दबदबा!
९ सुवर्ण, ३ रौप्य, ३ कांस्यसह एकूण १५ पदकांची झेप
अखिल भारतीय स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज
खालसाचा तायक्वांडोमध्ये सुवर्णमहोत्सव
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आंतर कॉलेज तायक्वांडो स्पर्धेत किंग सर्कल
येथील खालसा कॉलेजच्या खेळाडूंनी अक्षरशः पदकांची आतषबाजी करत क्रीडाजगतात दणका
दिला! मरीन लाईन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात पार पडलेल्या या
स्पर्धेत खालसाच्या खेळाडूंनी एकूण १५ पदके पटकावत आपला दबदबा सिद्ध केला. या कामगिरीत
तब्बल ९ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश असून खालसा कॉलेजच्या तायक्वांडो संघाने
क्रीडाक्षेत्रात दमदार छाप उमटवली.
सुवर्णवीरांची शानदार कामगिरी
स्पर्धेत खालसा कॉलेजच्या खेळाडूंनी ताकद, चपळता आणि कौशल्य यांचा सुरेख संगम साधत
सुवर्णपदकांची मालिका उभी केली. श्रीधर मलिक, शिवम शेट्टी, निहाल भोईर, अभिषेक पाटील, राज घुले, सहायता यादव, आश्रय विशाल आणि श्रद्धा खेतले या खेळाडूंनी शानदार लढती देत सुवर्ण पदके पटकावली आणि
कॉलेजचा झेंडा उंचावला.
रौप्य आणि कांस्य पदकांची भर
सुवर्णपदकांच्या झळाळीसोबतच खालसाच्या खेळाडूंनी रौप्य आणि
कांस्य पदकांचीही भर घातली. दिवेश बामणे, प्रेम पाटणे आणि आर्यन येवले यांनी दमदार कामगिरी करत रौप्य पदके जिंकली. तर प्रिया कपूर, रुतुजा आणि मोईन अली यांनी लढाऊ खेळ करत कांस्य पदके आपल्या नावावर केली.
राजेश मुराव यांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
या सर्व खेळाडूंना राजेश मुराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या
प्रशिक्षणामुळे खेळाडूंनी स्पर्धेत आत्मविश्वासाने खेळ करत उत्कृष्ट यश मिळवले.
विशेष म्हणजे मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून राजेश मुराव यांची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे. तर मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून स्वप्नील
सांळुखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे
प्रतिनिधित्व
या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारे खेळाडू आता अखिल भारतीय
आंतर विद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही
स्पर्धा १६ ते २० मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली असून मुलांची
स्पर्धा जालंदर येथे तर मुलींची स्पर्धा ओडिसा येथे होणार आहे. या राष्ट्रीय पातळीवरील
स्पर्धेतही खालसाचे खेळाडू चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खालसा
कॉलेजच्या या दमदार कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा
आत्मविश्वास निर्माण झाला असून तायक्वांडोच्या मैदानावर खालसाचा झेंडा अभिमानाने
फडकताना दिसत आहे.

Post a Comment
0 Comments