Type Here to Get Search Results !

डाटामॅटिक्स विरुद्ध चौगुले इन्श्युरन्स शील्ड टी-२०ची अंतिम लढत रंगणार प्लेट गटात सॅटेलाइट ग्रूप आणि मार्श मॅकलेनन अंतिम फेरीत नॅशनल क्रिकेट क्लबवर मंगळवारी रंगणार थरार

 


मानस चव्हाण

डाटामॅटिक्स विरुद्ध चौगुले

इन्श्युरन्स शील्ड टी-२०ची अंतिम लढत रंगणार

प्लेट गटात सॅटेलाइट ग्रूप आणि मार्श मॅकलेनन अंतिम फेरीत

नॅशनल क्रिकेट क्लबवर मंगळवारी रंगणार थरार

 

मुंबई : चौकार-षटकारांचा पाऊस, गोलंदाजांचा अचूक मारा आणि उपांत्य फेरीतील रंगतदार लढतींनी गाजलेल्या इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेचा आता अंतिम टप्पा गाठला असून एलिट गटात डाटामॅटिक्स आणि चौगुले या दोन बलाढ्य संघांमध्ये अंतिम लढत रंगणार आहे. तर प्लेट गटात सॅटेलाइट ग्रूप आणि मार्श मॅकलेनन यांनी दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी नॅशनल क्रिकेट क्लबच्या खेळपट्टीवर रंगणार असून क्रिकेटप्रेमींना रोमांचक लढतीची मेजवानी मिळणार आहे.

 

यतिन मढवीच्या अर्धशतकाने डाटामॅटिक्सचा दिमाखदार विजय

एलिट गटातील उपांत्य फेरीत डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ इंडियावर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बँक ऑफ इंडियाने २० षटकांत १२१ धावा केल्या. या डावात सारंगने एकाकी झुंज देत ७३ धावांची शानदार खेळी साकारली; मात्र अथर्व चव्हाणच्या भेदक गोलंदाजीसमोर इतर फलंदाज अपयशी ठरले. अथर्व चव्हाणने १९ धावांत ३ बळी घेत बँक ऑफ इंडियाचा डाव रोखला. प्रत्युत्तरात डाटामॅटिक्सने लक्ष्याचा पाठलाग करत अवघ्या १५ षटकांत सामना जिंकला. यतिन मढवीने ३३ चेंडूत ५० धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तर भुवन पाटीलने २९ धावा करत त्याला समर्थ साथ दिली.

 

तुषार सिंगच्या संयमी खेळीने चौगुले संघ अंतिम फेरीत

दुसऱ्या उपांत्य फेरीत चौगुले संघाने यूनियन बँकेवर ३ गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना यूनियन बँकेच्या फलंदाजांना आदित्य राणेच्या अचूक टप्प्याच्या आणि स्विंग गोलंदाजीसमोर मोठा संघर्ष करावा लागला. तरीही क्रिश सिंगने ५७ धावांची झुंजार खेळी करत यूनियन बँकेला १२७ धावांपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करताना चौगुले संघाची सुरुवात डळमळीत झाली; मात्र तुषार सिंगने ४२ चेंडूत ४४ धावांची संयमी खेळी करत संघाला स्थैर्य दिले आणि चौगुले संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

सर्वेश पाटीलची ९३ धावांची आतषबाजी; सॅटेलाइट ग्रूप अंतिम फेरीत



प्लेट गटाच्या उपांत्य फेरीत सॅटेलाइट ग्रूपने अजंठा फार्मावर ३६ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. सॅटेलाइट ग्रूपकडून सर्वेश पाटीलने ९३ धावांची तुफानी खेळी साकारली, तर अभिजित रोहंदियाने ५० धावांचे मौल्यवान योगदान दिले. या दोघांच्या फलंदाजीमुळे सॅटेलाइट ग्रूपने १७८ धावांचा भक्कम डोंगर उभारला. अजंठा फार्माकडून समर्थ कोकाटेने ४ बळी घेत चांगली कामगिरी केली. प्रत्युत्तरात मानस चव्हाणच्या भेदक गोलंदाजीसमोर अजंठा फार्माचा डाव १४२ धावांत आटोपला. मानस चव्हाणने २९ धावांत ५ विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली.

 

प्रदीप शर्मा-चिन्मय कदमची फटकेबाजी; मार्श मॅकलेननची विजयी मुसंडी

दुसऱ्या उपांत्य फेरीत मार्श मॅकलेनन संघाने गतविजेत्या युनायटेड पटनी इंडस्ट्रिजला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात प्रदीप शर्माने ५० चेंडूत ८३ धावा तर चिन्मय कदमने अवघ्या १६ चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली. त्यांच्या जोरावर मार्श मॅकलेननने २३९ धावांची प्रचंड धावसंख्या उभारली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना युनायटेड पटनी संघाने दमदार सुरुवात केली; मात्र त्यांना १८३ धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रेयस केरकरने २९ धावांत ३ बळी घेत युनायटेड पटनी संघाच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले.

 

अंतिम लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष

एलिट गटात डाटामॅटिक्स विरुद्ध चौगुले तर प्लेट गटात सॅटेलाइट ग्रूप विरुद्ध मार्श मॅकलेनन अशी रंगतदार अंतिम लढत मंगळवारी नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर रंगणार असून क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा चौकार-षटकारांचा जल्लोष आणि थरारक क्षण अनुभवायला मिळणार आहेत.

 


Post a Comment

0 Comments