Type Here to Get Search Results !

येथे घडत आहेत उद्याचे जिमनास्ट! चेंबूरच्या विद्यानिकेतनमध्ये तीन दशकांचा क्रीडा यज्ञ आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा डंका - ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी

 

येथे घडत आहेत उद्याचे जिमनास्ट!
चेंबूरच्या विद्यानिकेतनमध्ये तीन दशकांचा क्रीडा यज्ञ

आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा डंका - ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी

 


मुंबई : चेंबूरच्या क्रीडांगणात घाम गाळणाऱ्या छोट्या-छोट्या खेळाडूंच्या हातून उद्याचे जागतिक विजेते घडत आहेत! गेल्या तीन दशकांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या क्रीडा तपश्चर्येतून अनेक नामांकित जिमनास्ट आणि मल्लखांबपटू तयार झाले असून, आज श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन हे भारतीय क्रीडा नकाशावर तेजाने झळकत आहे. मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर येथे घडलेले खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकवत आहेत.

 


तीन दशकांचा क्रीडा यज्ञ, यशाची परंपरा

चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित या क्रीडा संकुलात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ सातत्याने जिम्नॅस्टिक्स आणि मल्लखांब प्रशिक्षण दिले जात आहे. या काळात ३० पेक्षा अधिक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, १०० पेक्षा अधिक खेाडूंनी राष्ट्रीय, तर २०० पेक्षा अधिक खेळाडूंनी राज्य स्तरावर आपली छाप उमटवली आहे. विविध स्पर्धांमध्ये एकूण २००० पेक्षा अधिक पदकांची कमाई ही या संस्थेच्या कर्तृत्वाची साक्ष देणारी ठरली आहे.

 


पुरस्कारांचा मानाचा तुरा

या यशस्वी परंपरेतूनच सागर ओव्हाळकर यांना मल्लखांबमधील पहिला अर्जुन पुरस्कार मिळाला. तसेच स्व. भा. म. पंत, स्व. किसन कदम, स्व. जयंत गायकवाड, स्व. नम्रता जाधव, डॉ. महेंद्र चेंबूरकर, राहुल ससाणे, श्याम सिंग बिष्ट, योगेश पवार, ललिता मेहता, ज्योती शिंदे, जयश्री प्रिंदावनेकर, मोहन बामणे, अरविंद शिंदे, लक्ष्मी पवार, कुणाल कोटेकर या दिग्गजांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय संस्थेतील एकूण २६ जणांची जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

 


आंतरराष्ट्रीय पातळीवरील चमकदार प्रतिनिधित्व

विद्यानिकेतनच्या रेवांत रणपिसे, श्लोक पडवळ, महादेव गावडे, श्लोक ठोंबरे, काव्या कुंडे, हर्ष अगरवाल, सान्वी शिंदे, आदित्य दिवे, दिआंत ससाणे, अर्थव जाणसकर, नमो युनियाल, अश्विन गोसावी, रुणल रणपिसे, ऋतुजा जगदाळे, आदित्य खसासे, आकाश गोसावी, वैदेही मयेकर, अर्ना पाटील, आचल गुरव, अक्षदा ढोकळे, कुणाल कोटेकर, रितेश बोरहाडे, प्रशांत गोरे, सोनाली बोरहाडे, प्रिती एखंडे, लक्ष्मी पवार या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

 


पायाभूत विचारातून उभारलेले क्रीडामंदिर

१९९० च्या दशकात स्व. भा. म. पंत यांनी शरद आचार्य यांच्या सहकार्याने शाळा आणि क्रीडा संकुल उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावे, या उद्देशाने जिम्नॅस्टिक्स, जलतरण, अॅथलेटिक्स, मल्लखांब, बास्केटबॉल आणि हँडबॉल यांसारख्या खेळांना प्राधान्य देण्यात आले. स्व. किसन कदम यांच्या सहकार्याने प्रशिक्षण शिबिरे नियमित सुरू झाली आणि त्यातून खेळाडूंची फळी तयार होत गेली.

 


कठोर सराव, साधेपणातून मोठी भरारी

दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत आणि रविवारी सकाळी प्रशिक्षण वर्ग चालतात. सध्या १०० पेक्षा अधिक मुले-मुली या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. सुरुवातीला २५ रुपयांपासून सुरू झालेली फी आज ५०० रुपये झाली असली तरी गरजूंसाठी ती माफ करण्याची उदात्त परंपरा कायम आहे.

 


अनुभवी प्रशिक्षकांचा मजबूत पाया

डॉ. महेंद्र चेंबूरकर आणि सुरेश भगत हे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनेक वर्षे काम पाहत असून त्यांना राहुल ससाणे, योगेश पवार, सुनील रणपिसे यांची साथ लाभते. तसेच योगेश पवार, सोनाली बोरहाडे हे आंतरराष्ट्रीय पंच असून संस्थेत १० राष्ट्रीय पंच कार्यरत आहेत.

 


संस्थेच्या पाठबळामुळे भरारी

अध्यक्ष अॅड. लिलाधर डाके, सचिव माणिक पाटील, तसेच सुबोध आचार्य, निवृत्ती डांगे, हरिश्चंद्र गवस, विनायक कुलकर्णी यांच्या सहकार्यामुळे ही क्रीडा चळवळ अधिक बळकट झाली आहे. भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.

 



भविष्यातील जागतिक विजेते घडवण्याची वाटचाल सुरूच!

आज अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्समध्ये राज्यात अव्वल असलेले विद्यानिकेतन, चेंबूरला आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेण्यात यशस्वी ठरले आहे. जिद्द, सातत्य आणि उत्कृष्ट प्रशिक्षणाच्या बळावर येथे घडणारे खेळाडू भविष्यात भारताला अधिक गौरव मिळवून देतील, यात शंका नाही!

Post a Comment

0 Comments