Type Here to Get Search Results !

हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती काका पवार तालमीला ५० लाखांची मदत! ऑलिम्पिक स्वप्नांना बळ पदकविजेत्या मल्लांचा गौरव आणि प्रशिक्षण केंद्राला मोठा हातभार कुस्तीविश्वासाठी सुवर्णक्षण!

 


हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती

काका पवार तालमीला ५० लाखांची मदत!

ऑलिम्पिक स्वप्नांना बळ

पदकविजेत्या मल्लांचा गौरव आणि प्रशिक्षण केंद्राला मोठा हातभार

कुस्तीविश्वासाठी सुवर्णक्षण!

 

मुंबई : महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वात उत्साहाची लाट उसळवणारी मोठी बातमी समोर आली आहे! डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला १२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती, तर काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला तब्बल ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा खेळाडूंप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

 

मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा

मुंबई येथे झालेल्या या विशेष भेटीत हर्षवर्धन सदगीर आणि अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी उद्योजक मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी सर, महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

हर्षवर्धनसाठी शिष्यवृत्ती; ऑलिम्पिक लक्ष्याला चालना

हर्षवर्धन सदगीर याच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत त्याला पुढील दोन वर्षांसाठी दरमहा पन्नास हजार रुपये प्रमाणे एकूण १२ लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली. ही मदत त्याच्या ऑलिम्पिक स्वप्नपूर्तीसाठी मोठा आधार ठरणार आहे.

 

काका पवार तालमीचा गौरव; ११ मल्लांच्या यशाला दाद

काका पवार यांच्या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्लांनी पदकांची लयलूट केल्याबद्दल त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. या मदतीमुळे कुस्ती प्रशिक्षणाला अधिक बळ मिळणार आहे.

 

काका पवार यांची भावना : “पवार आमचे तारणहार”

काका पवार यांनी आभार व्यक्त करत सांगितले की, शरद पवार हे खेळाडूंसाठी तारणहार आणि आधारस्तंभ आहेत. त्यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष धनादेश देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. क्रिकेटनंतर कुस्ती क्षेत्रातही ते सातत्याने मदतीला धावून येतात.”

 

हर्षवर्धनचे लक्ष्य : ऑलिम्पिककडे वाटचाल

हर्षवर्धन सदगीर म्हणाला, गुरू काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. मात्र माझे अंतिम ध्येय ऑलिम्पिक खेळणे आहे. शरद पवार यांची ही मदत माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे.”

 

शासनाकडून नोकरीचे आश्वासन

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काका पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. येत्या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याची माहिती काका पवार यांनी दिली.

 

कुस्तीपटूंना मिळालेला हा मोठा आधार महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला नवी ऊर्जा देणारा ठरत असून, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे!


Post a Comment

0 Comments