Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरीत सोलापूरच्या मल्लांची दणदणीत आगेकूच गादी विभागात पुण्याचा दबदबा! माती विभागात महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख विजयी गादीत शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ यांची एकतर्फी सरशी वाघोलीच्या मातीवर कुस्तीचा महायुद्ध रंगला!

 


महाराष्ट्र केसरीत सोलापूरच्या मल्लांची दणदणीत आगेकूच

गादी विभागात पुण्याचा दबदबा!

माती विभागात महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख विजयी

गादीत शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ यांची एकतर्फी सरशी

वाघोलीच्या मातीवर कुस्तीचा महायुद्ध रंगला!

 

पुणे : पुण्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या अडुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती आणि गादी या दोन्ही विभागांत थरारक लढतींचा वर्षाव होत असून, सोलापूर आणि पुण्याच्या मल्लांनी दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले आहे! प्रेक्षकांच्या जल्लोषात रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येक डावागणिक उत्कंठा शिगेला पोहोचत आहे.

 

महाराष्ट्र केसरी दावेदारांची आगेकूच

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे, बाळू बोडके, पृथ्वीराज मोहोळ, हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील आणि सिकंदर शेख यांनी आपापल्या लढती जिंकत आगेकूच केली. रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशन आयोजित या स्पर्धेचा थरार दिवसेंदिवस रंगतदार होत आहे.

 

माती विभागात सोलापूरची ताकद; चुरशीच्या लढती

महेंद्र गायकवाड यांनी उत्कंठावर्धक लढतीत विशाल बनकर याला ६-१ गुणांनी पराभूत, बाळू बोडके यांनी कोल्हापूरच्या बलाढ्य माऊली जमदाडेवर १०-५ गुणांनी सनसनाटी विजय, सिकंदर शेख यांनी पुण्याच्या अनिकेत मांगडे वर सुरुवातीची पिछाडी भरून काढत ८-१ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. या विभागात प्रत्येक लढत अत्यंत चुरशीची ठरत असून, मल्लांच्या ताकदीबरोबरच डावपेचांचीही कसोटी लागते आहे.

 


गादी विभागात पुण्याचा दबदबा; एकतर्फी विजयांची मालिका:

पृथ्वीराज मोहोळ यांनी १० गुणांची कमाई करत विजयी सलामी, शिवराज राक्षे यांनी प्रतीक जगताप विरुद्ध सुरुवातीचे दोन गुण गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत १० गुणांसह विजय, पृथ्वीराज पाटील यांनी पालघरच्या वैभव माने वर ८-० अशी एकतर्फी मात, तर हर्षवर्धन सदगीर यांनी बीडच्या राष्ट्रीय विजेता प्रतीक देशमुख वर १०-० अशा दणदणीत फरकाने विजय मिळवला. गादी विभागात पुण्याच्या मल्लांनी आपला स्पष्ट दबदबा सिद्ध केला आहे.

 

५७ किलो गटात मृणाल पाटीलचे सुवर्ण यश

माती विभागातील ५७ किलो वजनी गटात कोल्हापूरच्या राधानगरी येथील मृणाल पाटील यांनी सुवर्ण पदक, तर सुदर्शन पाटील यांनी कांस्य पदक पटकावले. हे दोन्ही मल्ल सागर चौगुले आणि नितीन कांबळे यांचे शिष्य असून त्यांच्या यशाने कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचा लौकिक वाढवला.

 

कुस्तीप्रेमींसाठी मेजवानी; अंतिम लढतींची उत्सुकता शिगेला

स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी, वाघोली येथे सुरू असलेल्या या स्पर्धांमध्ये प्रत्येक फेरीत रोमांच वाढत असून, महाराष्ट्र केसरी किताबासाठीची लढत अधिकच रंगत चालली आहे. सोलापूरच्या ताकदीला आणि पुण्याच्या डावपेचांना मिळालेली ही टक्कर आता अंतिम टप्प्यात काय रंग दाखवते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे!

 


Post a Comment

0 Comments