ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी
स्पर्धा - २०२६
राजश्री छत्रपती शाहू (किशोरी),
छत्रपती शिवाजी
(किशोर) विजेते
किल्ले माऊली कुमारी गटात अजिंक्य
खारलँड मैदानावर अंतिम लढतींचा थरार
विजेतेपदासाठी जबरदस्त झुंज
ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आणि ऍडव्होकेट सौ. पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा – २०२६
मध्ये अंतिम लढतींनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले.
कळवा,
खारेगाव, ठाणे (प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कूलसमोरील मैदानावर
रंगलेल्या या निर्णायक सामन्यांत राजश्री छत्रपती शाहू (किशोरी गट),
छत्रपती शिवाजी (किशोर
गट) आणि किल्ले माऊली (कुमारी गट) यांनी दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
किशोरी गटात राजश्री छत्रपती शाहूचा ३६-२६ विजय
किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात राजश्री छत्रपती शाहू संघाने रा. फ. नाईक संघाचा ३६-२६ असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. आक्रमक सुरुवात करत शाहू
संघाने पूर्वार्धात लोण देत १९-०५ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात रा. फ. नाईक संघाने एक लोण देत पुनरागमनाचा प्रयत्न केला,
मात्र शाहू संघाने पुन्हा एक लोण देत सामना
१० गुणांनी
आपल्या बाजूने झुकवला. सोनम पंडित हिने शाहू संघाकडून तर ज्ञानेश्वरी शिंदे हिने रा. फ. नाईककडून चतुरस्त्र खेळ करत लक्ष वेधले.
किशोर गटात छत्रपती शिवाजीची ३९-३७ थरारक सरशी
किशोर गटातील अंतिम सामना अत्यंत रंगतदार ठरला,
ज्यात छत्रपती शिवाजी संघाने राजश्री छत्रपती शाहू संघावर ३९-३७ अशी निसटती मात करत विजेतेपद पटकावले. पहिल्या डावात
२ लोण देत २४-०९
अशी मोठी आघाडी घेतलेल्या शिवाजी संघाने वर्चस्व प्रस्थापित
केले. मात्र उत्तरार्धात शाहू संघाने जोरदार पुनरागमन करत त्या दोन्ही लोणची
परतफेड केली आणि सामना अत्यंत चुरशीचा केला. अखेरच्या क्षणी शिवाजी संघाने आघाडी
टिकवत विजय मिळवला. अमित गुप्ता, अभय वर्मा आणि अजित वर्मा यांच्या चढाई-पकडीच्या शानदार खेळामुळे हा विजय शक्य झाला.
तर शाहू संघाकडून हिमांशु जैसवाल, कृष्णा सोनदिया आणि अभिजित यादव यांनी शेवटपर्यंत झुंज देत सामना रंगतदार ठेवला.
कुमारी गटात किल्ले माऊलीचा ५२-२७ धडाका
कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात किल्ले माऊली संघाने ज्ञानशक्ती संघाचा ५२-२७ असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात
लोण देत २२-१५
अशी आघाडी घेतलेल्या माऊली संघाने उत्तरार्धात तुफानी खेळ
करत आणखी ३ लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. मयुरी जोशी, रिंकू मलिक आणि रूपाली सातपुते यांच्या चढाई-पकडीच्या झंझावाती खेळामुळे हा मोठा विजय शक्य
झाला. ज्ञानशक्तीकडून निधी राजोळे आणि हिमानी गायकवाड यांनी प्रयत्न केले, मात्र उत्तरार्धात त्यांचा खेळ ढेपळल्याने सामना एकतर्फी
झाला.
स्पर्धेचा शानदार समारोप;
नवोदितांना मोठे
व्यासपीठ
या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील नवोदित
खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याचे मोठे व्यासपीठ मिळाले. अंतिम लढतींतील थरार,
खेळाडूंची जिद्द आणि संघभावना यामुळे स्पर्धेचा दर्जा
उंचावला असून, कबड्डीप्रेमींसाठी
हा सोहळा संस्मरणीय ठरला.
.jpeg)

Post a Comment
0 Comments