Type Here to Get Search Results !

रायपूरच्या पाण्यात महाराष्ट्राचा जल्लोष! पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत जलतरणात ‘पदक पंचमी’ तन्वी धुर्वेचा सुवर्ण तेजोमय ठसा

 

रायपूरच्या पाण्यात महाराष्ट्राचा जल्लोष!

पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत जलतरणात ‘पदक पंचमी’

तन्वी धुर्वेचा सुवर्ण तेजोमय ठसा

 

रायपूर : पाण्यात वेग, श्वासात जिद्द आणि प्रत्येक स्ट्रोकमध्ये विजयाची चाहूल! १ ली खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी जबरदस्त कामगिरी करत १ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्य अशी ‘पदक पंचमी’ साकारली. नागपूरच्या तन्वी धुर्वेने सुवर्ण पदक पटकावत महाराष्ट्राचे खाते उघडले, तर पलाश ठाकूरने दुहेरी रौप्य जिंकत दिवस गाजवला आणि भक्तीश कुमारेने कांस्य पदक मिळवत महाराष्ट्राचा दबदबा कायम ठेवला.

 

तन्वी धुर्वेचा सुवर्ण झंकार; दुहेरी पदकाची कमाल

स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात महाराष्ट्राचा जयघोष दुमदुमला. तन्वी धुर्वेने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १:२३.६५ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक, तर १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक पटकावले. तिच्या या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या मोहिमेला शानदार सुरुवात मिळाली.

 

पलाश ठाकूरचा ‘डबल धमाका’

मुलांच्या गटात पलाश ठाकूरने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात प्रत्येकी रौप्य पदके जिंकत दुहेरी यश संपादन केले. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ३२.१३ सेकंद वेळ नोंदवत त्याने शानदार कामगिरी केली. या प्रकारात कर्नाटकच्या मणिकांता एलने ३१.०८ सेकंद वेळेसह सुवर्ण पदक पटकावले.

 

भक्तीश कुमारेचे कांस्य योगदान

महाराष्ट्राच्या पदकतालिकेत भर घालत भक्तीश कुमारेने २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदक मिळवले. मुलींसोबत मुलांनीही पदकांची परंपरा कायम ठेवत संघाची ताकद दाखवून दिली.

 

तन्वीची प्रेरणादायी वाटचाल

तन्वी धुर्वे ही कर्नाटक व ओडिशानंतर सुवर्ण पदक जिंकणारी महाराष्ट्राची पहिली खेळाडू ठरली. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या तन्वीने पहिल्याच खेलो इंडिया स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. मी गेल्या ८ वर्षांपासून सराव करते. माझे वडील सुखदेव हे आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू असून भाऊ सार्थक वॉटर पोलोमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता आहे. कुटुंबाकडून मिळालेली प्रेरणा माझ्यासाठी मोठी ताकद आहे,” असे तिने सांगितले.

 

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले आणि पथकप्रमुख भाग्यश्री बिले यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments