Type Here to Get Search Results !

मुंबई श्रीचा धमाका १३ मार्चला! मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील २५० पेक्षा अधिक पुरुष-महिला खेळाडूंचा सहभाग अपेक्षित मालाडमध्ये रंगणार पीळदार महासंग्राम मुंबईच्या स्नायूशक्तीचा महाउत्सव

 


मुंबई श्रीचा धमाका १३ मार्चला!

मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील २५० पेक्षा अधिक पुरुष-महिला खेळाडूंचा सहभाग अपेक्षित

मालाडमध्ये रंगणार पीळदार महासंग्राम

मुंबईच्या स्नायूशक्तीचा महाउत्सव

 

मुंबई : मुंबईतील शरीरसौष्ठवविश्व पुन्हा एकदा थरारण्यासाठी सज्ज झाले आहे! शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाणारी मुंबई श्री २०२६’ जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या १३ मार्च रोजी मालाड (पूर्व) येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय मैदान, जय भवानी नगर येथे रंगणार आहे. तब्बल २५० पेक्षा अधिक पुरुष आणि महिला शरीरसौष्ठवपटू या पीळदार महायुद्धात सहभागी होणार असल्यामुळे यंदाचा सोहळा अधिक भव्य, रंगतदार आणि चुरशीचा ठरणार आहे.

 

मुंबई श्री – शरीरसौष्ठवपटूंचे पहिले प्रेम

मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंसाठी मुंबई श्री’ ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नसून ती त्यांच्या स्वप्नांचा मुकुट आहे. अनेक खेळाडूंना मोठ्या यशाची वाट दाखवणाऱ्या या स्पर्धेचा दर्जा वर्षानुवर्षे उंचावत गेला आहे. आर्थिक अडचणी असोत किंवा अन्य संकटे, तरीही बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांनी या स्पर्धेच्या आयोजनात कधीही तडजोड केलेली नाही. यंदाही स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा थाट आणि विजेत्यांना मान-सन्मान देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली.

 

अडीचशे खेळाडूंचा दमदार सहभाग

यंदाच्या स्पर्धेत किमान २५० शरीरसौष्ठवपटू सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. यात संदीप सावळे, मनोज बोचरे, विशाल धावडे, गणेश पेडामकर, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे, अमित साटम, अक्षय खोत, सुयश सावंत, चेतन नाईक यांसारखे खेळाडू पुन्हा एकदा ‘मुंबई श्री’ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. स्पर्धा एकूण ८ वजनी गटांत खेळविण्यात येणार असून प्रत्येक गटातील अव्वल ५ खेळाडूंना तसेच किताब विजेता आणि उपविजेता यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

वजन तपासणी आणि नोंदणीची माहिती

स्पर्धकांची मोठी संख्या लक्षात घेऊन १३ मार्च रोजीच स्पर्धास्थळी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० या वेळेत वजन तपासणी केली जाणार आहे. ही माहिती मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष किट्टी फणसेका यांनी दिली.

 

फिजीक स्पोर्ट्स आणि महिला शरीरसौष्ठवाची वाढती क्रेझ

अलीकडच्या काळात शरीरसौष्ठवात फिजीक स्पोर्ट्स आणि महिला शरीरसौष्ठव या प्रकारांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आयोजकांनी या गटांनाही विशेष महत्त्व दिले आहे. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्स गटात खेळाडूंची संख्या १०० च्या आसपास असल्यामुळे हा गट दोन विभागांत खेळविण्यात येणार आहे: १७० सेमी पर्यंत, १७० सेमी वरील.

 


महिलांच्या गटात प्रतिष्ठेचा मिस मुंबई’ किताब जिंकण्यासाठी जोरदार संघर्ष अपेक्षित आहे. गतविजेती रेखा शिंदे आपले जेतेपद टिकविण्यासाठी प्रयत्नशील असेल. तिला लविना, राजश्री मोहिते, अपूर्वा पालव, वर्षा माने, यशोदा भोर यांसारख्या खेळाडूंकडून कडवे आव्हान मिळणार आहे, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.

 

महाराष्ट्र श्रीसाठी निवड

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून मुंबई आणि मुंबई उपनगर संघाची निवड केली जाईल. निवड झालेले खेळाडू १५ मार्च रोजी पनवेल येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करतील.

 

स्पर्धकांना संपर्काचे आवाहन

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी अधिक माहितीसाठी पुढील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेने केले आहे:

सुनील शेगडे – ९२२३३४८५६८, विशाल परब – ८९२८३१३३०३, राजेश निकम – ९९६९३६९१०८, राम नलावडे – ९८७०३०६१२७, किरण कुडाळकर – ९८७०३०६१२७, विजय झगडे – ९९६७४६५०६३, जयदीप पवार – ८०८०८०९४३८, गिरीश कोटियन – ७७३८५४५२३०, सुभाष जाधव – ९००४३१३४३९

 

मुंबईतील शरीरसौष्ठवप्रेमींसाठी १३ मार्च हा दिवस खऱ्या अर्थाने स्नायूशक्तीचा उत्सव ठरणार असून मालाडमध्ये पुन्हा एकदा ‘मुंबई श्री’चा पिळदार जल्लोष रंगणार आहे!


Post a Comment

0 Comments