महिला दिनानिमित्त कुर्ल्यात शालेय मुलींची
कबड्डी स्पर्धा शनिवार पासून
गोरखनाथ महिला संघाच्या पुढाकाराने गांधी
मैदानावर रंगणार क्रीडाउत्सव
कुर्ल्यात कबड्डीचा जल्लोष; मुलींना मिळणार क्रीडामंच
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात महिला दिनाच्या निमित्ताने
आज क्रीडाउत्साहाचा नवा अध्याय रंगणार आहे. गोरखनाथ महिला संघ, कुर्ला यांच्या पुढाकाराने आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ, कुर्ला यांच्या सहकार्याने १५ वर्षांखालील शालेय मुलींची मोफत कबड्डी
स्पर्धा आज ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता गांधी मैदान, कुर्ला येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय खेळाडू व
प्रशिक्षक बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही स्पर्धा
मुलींना कबड्डीच्या माध्यमातून क्रीडा कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.
राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान सोहळा
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रीडा क्षेत्रात
उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान. यामध्ये राष्ट्रीय
खेळाडू सौ. श्रद्धा आनंद गंभीर, क्रीडा शिक्षिका – पुष्पा डावरे (NIS),
सोमय्या कॉलेज, सेंट्रल रेल्वे महिला कबड्डी कोच – उषा सावंत
साळुंखे, सेंट्रल रेल्वे टीसी – सौ. माधवी कदम (NIS), क्रीडा शिक्षिका – हशू अडवाणी मेमोरियल स्कूल, तसेच सौ. मेघा म्हात्रे (PSI) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सन्मानामुळे
उपस्थित खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मुंबईतील विविध शाळांचा उत्स्फूर्त सहभाग
या स्पर्धेत मुंबई व उपनगरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला
आहे. त्यामध्ये महिला मंडळ माध्यमिक विद्यालय – कुर्ला, कुमुद विद्यामंदिर इंग्रजी माध्यम – गोवंडी, शिवाजी टेक्निकल हायस्कूल – घाटकोपर, सेंट जॉन हायस्कूल – बोरिवली, एस. आय. ई. एस. हायस्कूल, ज्ञान विकास विद्यालय – कोपरखैरणे, आणि जवाहर विद्या भवन – चेंबूर या शाळांचा
समावेश आहे. या शाळांतील मुली कबड्डीच्या मैदानावर आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज
झाल्या आहेत.
महिला सक्षमीकरणाचा क्रीडामय संदेश
महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा
केवळ क्रीडा स्पर्धा नसून मुलींमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि क्रीडाप्रेम वाढवण्याचा एक
महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या स्पर्धेबाबत माहिती देताना संस्थेच्या अध्यक्षा सौ. शलाका
कोरगावकर यांनी सांगितले की, मुलींना क्रीडामंच उपलब्ध करून देणे आणि त्यांना
कबड्डी सारख्या भारतीय खेळात प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

Post a Comment
0 Comments