Type Here to Get Search Results !

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२६ महिलांत ज्ञानशक्ती युवा, संघर्ष मंडळ, संकल्प क्रीडा तिसऱ्या फेरीत होतकरू मंडळ-अ उपउपांत्या फेरीत खारलँड मैदानावर रंगली कबड्डीची चुरस

 


ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२६

महिलांत ज्ञानशक्ती युवा, संघर्ष मंडळ, संकल्प क्रीडा तिसऱ्या फेरीत

होतकरू मंडळ- उपउपांत्या फेरीत

खारलँड मैदानावर रंगली कबड्डीची चुरस

 

ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने आणि ऍडव्होकेट सौ. पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२६ मध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. कळवा, खारेगाव, ठाणे (प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कूलसमोरील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या गटात ज्ञानशक्ती युवा, संघर्ष मंडळ, संकल्प क्रीडा यांनी तिसरी फेरी गाठली, तर होतकरू मंडळ – अ संघाने उपउपांत्या फेरीत धडक दिली.

 

ज्ञानशक्ती युवाची ३३–२२ सरशी

महिलांच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात ज्ञानशक्ती युवा संघाने जयशिव अकादमीवर ३३–२२ असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली. विश्रांतीला १८–१० अशी आघाडी घेतलेल्या ज्ञानशक्ती संघाने दोन्ही डावात १–१ लोण देत आपला विजय अधिक भक्कम केला. धानी राणे आणि हिमाली गायकवाड यांनी ज्ञानशक्तीकडून प्रभावी खेळ केला, तर कल्याणी डोंगरे आणि गायत्री काटे यांनी जयशिव संघाकडून चतुरस्त्र खेळ सादर केला.

 

संघर्ष मंडळाची थरारक ३५–३३ बाजी

संघर्ष क्रीडा मंडळाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात स्फूर्ती सेवा संघाला ३५–३३ असे चकवून तिसरी फेरी गाठली. तृप्ती देवकाते आणि प्रतीक्षा मरकड यांच्या आक्रमक खेळामुळे संघर्षने पूर्वार्धात २ लोण देत २७–१२ अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात दीपाली पागाडे आणि स्मिता शिंदे यांनी स्फूर्ती सेवाकडून जोरदार पुनरागमन करत संघर्षवर लोण देत आघाडी कमी केली, पण अखेरीस संघर्षचा विजय रोखण्यात त्या कमी पडल्या.

 

संकल्प क्रीडाची २३–१८ विजयश्री

संकल्प क्रीडा संघाने न्यू साई श्रद्धा संघावर २३–१८ असा विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला दोन्ही संघ ९–९ अशा बरोबरीत होते. मात्र उत्तरार्धात वनिता मंचेकर, मेघना खेडेकर आणि गौरी भोसले यांच्या चढाई व पकडीच्या प्रभावी खेळामुळे संकल्पने सामना आपल्या बाजूने फिरवला. स्नेहा हटाले आणि मयुरी काळे यांनी न्यू साई श्रद्धाकडून कडवी झुंज दिली.

 

होतकरू मंडळ – अ उपउपांत्या फेरीत

रात्री उशिरा झालेल्या सामन्यात होतकरू मंडळ – अ संघाने माऊली स्पोर्ट्सवर ४४–२३ असा दणदणीत विजय मिळवत उपउपांत्या फेरीत धडक दिली. पहिला लोण देत सावध खेळ करत होतकरूने मध्यंतराला १९–१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर आणखी २ लोण देत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. वेदिका वावेकर, प्राजक्ता पुजारी आणि ऐश्वर्या राऊत यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला, तर माऊलीकडून नीलम वराडकर हिने एकाकी झुंज दिली.

 

पुरुष गटात ओम् वर्तकनगर, श्री समर्थ आणि जय खामदेश्वर तिसऱ्या फेरीत


पुरुषांच्या सामन्यांत ओम् वर्तकनगर संघाने विवेकस्मृतीचा ३५–०७ असा एकतर्फी पराभव केला. श्री समर्थ संघाने अरुण मंडळावर ३२–२४ अशी सरशी मिळवली, तर जय खामदेश्वर संघाने साई कृष्णावर २५–०४ असा दणदणीत विजय मिळवत तिसरी फेरी गाठली.

 

स्पर्धेत रंगत वाढली

ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या संघांच्या दमदार कामगिरीमुळे स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील फेऱ्यांमध्ये आणखी थरारक सामने पाहायला मिळणार असल्याने कबड्डीप्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे.


Post a Comment

0 Comments