आयपीएल २०२६च्या रंगतदार सुरुवातीची चाहूल
संजू सॅमसनमुळे सीएसकेला मोठा फायदा
आरसीबीचा २८ मार्चला एसआरएचविरुद्ध पहिला सामना
मुंबई इंडियन्स, केकेआर आणि आरसीबीच्या लढतीकडे
क्रिकेटविश्वाचे लक्ष
मुंबई : भारतीय
क्रिकेटप्रेमींसाठी पुन्हा एकदा उत्साहाचा सण सुरू होणार आहे. टाटा आयपीएल २०२६
स्पर्धेच्या पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर होताच क्रिकेटविश्वात
चर्चेला उधाण आले आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघ २८
मार्च रोजी आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) विरुद्ध
मोहिमेला सुरुवात करणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स (सीएसके), राजस्थान रॉयल्स
(आरआर), मुंबई इंडियन्स (एमआय) आणि कोलकाता नाईट रायडर्स
(केकेआर) यांच्या सामन्यांबाबत तज्ज्ञांनीही रोचक
प्रतिक्रिया दिल्या आहेत.
घरच्या मैदानावरील आव्हान; आरसीबीसमोर कठीण कसोटी
माजी भारतीय क्रिकेटपटू अभिनव मुकुंद यांनी
आरसीबीसमोर असलेल्या आव्हानांकडे लक्ष वेधले. त्यांच्या मते एम. चिन्नास्वामी
स्टेडियमवर आरसीबीचा घरच्या मैदानावरील विक्रम अपेक्षेइतका चांगला नाही, ही बाब संघासाठी चिंतेची आहे. मागील
हंगामात आरसीबीचा बाहेरच्या मैदानावरील विक्रम घरच्या तुलनेत अधिक चांगला होता.
गेल्या ८ ते ९ महिन्यांत चिन्नास्वामी मैदानावर मोठा क्रिकेट सामना झालेला
नसल्यामुळे परिस्थितीचा अचूक अंदाज घेणेही संघासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यातच
आरसीबीला सुरुवातीलाच सनरायझर्स हैदराबाद आणि नव्याने बांधणी केलेल्या चेन्नई
सुपर किंग्ससारख्या बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार असल्याने त्यांच्या
मोहिमेची सुरुवातच कठीण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स – पहिल्या टप्प्यातील सर्वात
मोठा सामना
माजी अष्टपैलू इरफान पठाण यांच्या मते पहिल्या २०
सामन्यांमधील सर्वात मोठा सामना म्हणजे मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील लढत
ठरणार आहे. रोहित शर्माची गेल्या २ वर्षांतील शानदार फॉर्म, तसेच विराट कोहलीची दमदार फलंदाजी
पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याशिवाय रजत पाटीदार आयपीएल विजेता
कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे, तर जितेश शर्मा आणि
अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्या कामगिरीकडेही क्रिकेटविश्वाचे लक्ष
लागले आहे. वानखेडे स्टेडियमवरील वातावरण, तुफानी
फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीमुळे हा सामना स्पर्धेतील सर्वात रोमांचक ठरू शकतो,
असे पठाण यांनी सांगितले.
संजू सॅमसनचा सीएसकेला मोठा फायदा
सीएसकेच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन हा निर्णायक
घटक ठरू शकतो, असेही इरफान
पठाण यांनी स्पष्ट केले. राजस्थान रॉयल्सच्या खेळशैलीची, पॉवरप्लेतील रणनीतीची आणि मधल्या षटकांतील दृष्टिकोनाची संपूर्ण माहिती
सॅमसनला असल्यामुळे सीएसकेला मोठा फायदा मिळू शकतो. राजस्थानच्या
अनेक युवा खेळाडूंनी सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळले असल्याने त्याच्या अनुभवाचा
संघाला मोठा फायदा होणार आहे. त्यातच टी-२० विश्वचषकातील शानदार फॉर्म आणि
गुवाहाटीच्या मैदानाचा अनुभवही सीएसकेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
मुंबई इंडियन्सचा विजयी सुरुवातीचा निर्धार
माजी फलंदाज संजय बांगर यांच्या मते मुंबई
इंडियन्स यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयानिशी करण्यासाठी उत्सुक आहे. मागील
काही हंगामांत एमआयला सुरुवातीला पराभवांचा सामना करावा लागला होता आणि नंतर
त्यांनी पुनरागमन केले होते. मात्र यंदा संघाला सुरुवातीपासून आघाडी घ्यायची आहे. पाच
वर्षांहून अधिक काळ विजेतेपदापासून दूर असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी
केकेआरविरुद्धचा पहिला सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असे बांगर यांनी सांगितले.
टाटा आयपीएल २०२६ची ही रंगतदार स्पर्धा २८ मार्चपासून सुरू
होत असून सर्व सामने ‘जिओहॉटस्टार’ आणि ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर थेट
प्रक्षेपित केले जाणार आहेत.

Post a Comment
0 Comments