खालसाचे तायक्वांडोपटू चमकले
अखिल भारतीय स्पर्धेत ३ कास्य पदकांची दमदार कमाई!
जालंधरमध्ये खालसा कॉलेजचा झंझावात
आर्यन येवले, निहाल भोईर, ओम कदम यांची झुंजार लढत ठरली गाजलेली
जालंधरमध्ये खालसाचा दमदार ठसा
मुंबईच्या क्रीडाक्षेत्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत
गुरु नानक खालसा कॉलेजच्या तायक्वांडोपटूंनी जालंधर (पंजाब) येथे रंगलेल्या अखिल
भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत झंझावात निर्माण केला. देशभरातील तब्बल
२३४ विद्यापीठे
आणि १००० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी असलेल्या या स्पर्धेत खालसाच्या खेळाडूंनी दमदार
लढती देत ३ कास्य पदकांची कमाई केली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यांमध्ये
त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
पदकवीरांची झुंजार कामगिरी
या स्पर्धेत आर्यन येवलेने ६८
किलो वजनी गटात शानदार खेळ करत कास्य पदक पटकावले. त्याचबरोबर
निहाल भोईरने ८० किलो खालील गटात, तर ओम कदमने
देखील प्रभावी कामगिरी करत कास्य पदकावर आपले नाव कोरले. तिघांनीही प्रत्येक
सामन्यात आक्रमकता आणि तांत्रिक कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला. अंतिम
फेरीच्या उंबरठ्यावर अत्यंत निसटत्या पराभवामुळे त्यांचा प्रवेश थोडक्यात हुकला,
मात्र त्यांच्या लढाऊ वृत्तीने सर्वांचे लक्ष वेधले.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
या यशामागे प्रशिक्षक राजेश मुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन निर्णायक ठरले. त्यांच्या कसून
प्रशिक्षणामुळे खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळ करत प्रत्येक फेरीत आपली ताकद
दाखवली. स्पर्धेतील अनुभव आणि रणनीती यांचा उत्तम संगम साधत खालसाच्या संघाने आपली
छाप पाडली.
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या
डॉ. रत्ना शर्मा
यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले,
तर क्रीडा संचालिका जसवीर कौर यांनीही त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. खालसा
कॉलेजच्या या यशामुळे मुंबईच्या क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,
भविष्यात या खेळाडूंकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा
व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments