महाराष्ट्र कॅरमला नवा ‘स्टाईल’! अधिकृत टी-शर्टचे भव्य
अनावरण
विश्वविजेते खेळाडूंच्या उपस्थितीत
ऐतिहासिक सोहळा
खेळाडूंसाठी नवे निर्णय जाहीर
कॅरमविश्वात ‘ड्रेस कोड’ची धमाकेदार एन्ट्री!
मुंबई : महाराष्ट्र
कॅरमच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरावा असा भव्य सोहळा आज प्रभादेवीत रंगला आणि
कॅरमपटूंना मिळाला एक नवा ‘स्टाईल स्टेटमेंट’! महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे तयार करण्यात आलेल्या अधिकृत रंगीत टी-शर्टचे अनावरण
आज सकाळी १०.३० वाजता पु. ल. देशपांडे ऑडिटोरियम,
रवींद्र नाट्य मंदिर
येथे पार पडले. सुप्रसिद्ध विकासक विजय पाटील यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला,
तर विश्वविजेते कॅरमपटू प्रशांत मोरे आणि संदीप दिवे
यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. जवळपास
२०० पेक्षा अधिक खेळाडू,
पंच आणि
कॅरमप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती, उत्साहाचा उच्चांक
या ऐतिहासिक क्षणी जितेंद्र शाह, अरुण केदार, अजित सावंत, केतन चिखले, दत्तप्रसाद शेंबेकर, संतोष चव्हाण यांसह सिस्का कॅरम कंपनीचे प्रमुख अतुल मेहरा उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत टी-शर्टचे
अनावरण होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले आणि कॅरमविश्वात नव्या
पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त झाली.
आधुनिक सुविधा आणि नवे निर्णय जाहीर
यावेळी अरुण केदार यांनी संघटनेच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देताना
सांगितले की, सन
२०२६-२०२७ साठी सिस्का कंपनीचे ‘बुलेट शॉट’ कॅरम बोर्ड्स व सोंगट्यांचा वापर
सर्व स्पर्धांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंच्या
हितासाठी अनेक मोठे निर्णय जाहीर करण्यात आले—महिलांच्या बक्षिसांमध्ये वाढ,
पंचांच्या मानधनात वाढ,
विश्व अजिंक्यपद व
विश्वचषक विजेत्यांना रोख पारितोषिक, राज्य संघासाठी वातानुकूलित रेल्वे प्रवासाची सुविधा आणि
ऑनलाईन नोंदणीची सक्ती यांचा त्यात समावेश आहे.
७७ कलमांची मार्गदर्शिका – शिस्तबद्धतेकडे वाटचाल
संघटनेने तयार केलेली ७७ कलमांची सविस्तर स्पर्धा व सर्वसाधारण मार्गदर्शिका
यापुढे सर्व खेळाडू, पंच आणि पदाधिकाऱ्यांसाठी बंधनकारक असणार असल्याचेही स्पष्ट
करण्यात आले. या निर्णयामुळे स्पर्धांचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक
होणार आहे.
असोसिएशनच्या उपक्रमांचे कौतुक
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय पाटील यांनी असोसिएशनच्या उपक्रमांचे कौतुक करत,
“हा उपक्रम कॅरम खेळाला नवी दिशा
देणारा आहे,” असे
मत व्यक्त केले. तर जितेंद्र शाह यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन केतन चिखले यांनी प्रभावीपणे केले.
कॅरमला नवी ओळख
अधिकृत टी-शर्टच्या अनावरणामुळे महाराष्ट्रातील कॅरम
खेळाडूंना एकसमान ओळख मिळणार असून खेळ अधिक व्यावसायिक पातळीवर जाण्याची दिशा
मिळाली आहे. हा सोहळा म्हणजे कॅरमच्या प्रगतीचा नवा टप्पा ठरला आहे.


Post a Comment
0 Comments