Type Here to Get Search Results !

रत्नागिरीच्या वाघजाईने मुंबई जिंकली! नाशिकच्या ब्रम्हाचा धुव्वा उडवत ‘राजाभाऊ देसाई चषक’ावर कोरले नाव मुंबईचे सर्व संघ उपांत्य फेरीतच ढेपाळले

 


रत्नागिरीच्या वाघजाईने मुंबई जिंकली!

नाशिकच्या ब्रम्हाचा धुव्वा उडवत ‘राजाभाऊ देसाई चषक’ावर कोरले नाव

मुंबईचे सर्व संघ उपांत्य फेरीतच ढेपाळले

 

मुंबई (क्री. प्र.)प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत रंगलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेचा शेवट रत्नागिरीच्या संघाच्या दिमाखदार विजयाने झाला. तब्बल १४ मुंबईकर संघांना मागे टाकत रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने केवळ स्पर्धाच नव्हे तर मुंबईकरांची मनेही जिंकली. अंतिम लढतीत नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबवर ३९-१६ असा एकतर्फी विजय मिळवत वाघजाईने अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या सामन्यापासून सुसाट खेळ करणाऱ्या वाघजाईने अंतिम फेरीतही प्रतिस्पर्ध्याला संधी न देता अजिंक्य पवारच्या पावरफुल चढायांमुळे विजयाचा झेंडा रोवला आणि त्याच अजिंक्य पवारला मालिकावीराचा मान मिळाला.

 

पहिल्या पाच मिनिटांतच सामन्याचा निकाल स्पष्ट

अंतिम सामन्याची सुरुवात होताच वाघजाई क्रीडा मंडळाने अक्षरशः आक्रमणाचा धडाका लावला. पहिल्याच पाच मिनिटांत लोण चढवत २०-९ अशी आघाडी घेत त्यांनी सामन्याचे चित्र स्पष्ट केले. अजिंक्य पवारच्या झंझावाती चढायांनी ब्रम्हाच्या बचावफळीची अक्षरशः मोडतोड केली. मध्यंतराला वाघजाईने २५-९ अशी प्रचंड आघाडी घेतली होती आणि त्यानंतरचा उत्तरार्ध केवळ औपचारिकता ठरला. ब्रम्हाकडून आकाश शिंदे, वैभव कांबळे, रत्नेश पाटील यांसह अन्य खेळाडूंना वाघजाईच्या झंझावाताला तोंड देता आले नाही. अखेर वाघजाईने ३९-१६ असा विजय मिळवत अजिंक्यपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत अजिंक्य पवारने १० गुणांची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला.

 

प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, पण सामने ठरले एकतर्फी

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीत गेल्या चार दिवसांपासून कबड्डीचा रांगडा थरार अनुभवायला मिळत होता. अंतिम दिवशीही तब्बल ,००० कबड्डीप्रेमींनी मैदानावर गर्दी केली होती. मात्र उपांत्य सामने आणि अंतिम सामना अपेक्षेइतका रंगला नाही. मुंबईच्या पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि एसएसजी फाऊंडेशन या संघांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण दोन्ही संघ उपांत्य फेरीतच पराभूत झाल्याने मुंबईच्या चाहत्यांची निराशा झाली.

 

उपांत्य फेरीत वाघजाईचा दबदबा

उपांत्य फेरीत एसएसजी फाऊंडेशनकडे पंकज मोहिते आणि आशिष चौधरीसारखे तडफदार चढाईवीर असल्यामुळे सामना रंगेल अशी अपेक्षा होती. मात्र अजिंक्य पवारने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत मध्यंतरालाच २८-१७ अशी निर्णायक आघाडी घेतली. पंकज मोहितेने काही शानदार चढाया करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु वाघजाईच्या संघाने त्याला रोखत ५०-२६ असा दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात अजिंक्य पवारने १७ चढाईचे आणि २ पकडीचे गुण मिळवत एकहाती विजय मिळवून दिला.

 

आकाश शिंदेचा सुपरडुपर खेळ

दुसऱ्या उपांत्य सामन्यात नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीवर ४३-२२ असा विजय मिळवला. या सामन्यात आकाश शिंदेने तब्बल २४ चढाईचे गुण मिळवत अक्षरशः एकहाती सामना जिंकवून दिला. पार्ले महोत्सवकडून अक्षय तावडेने जोरदार प्रयत्न केले, मात्र ब्रम्हाच्या आक्रमणापुढे त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.

 

अजिंक्य पवार मालिकावीर; अन्य पुरस्कारांची लयलूट

स्पर्धेच्या अखेरीस उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. अजिंक्य पवार याला मालिकावीराचा किताब मिळाला. त्याच संघातील शुभम शिंदे याने सर्वोत्तम पकडवीर पुरस्कार पटकावला. ब्रम्हाच्या आकाश शिंदे याला सर्वोत्तम चढाईवीर, तर अक्षय तावडे याला सर्वोत्तम उपयुक्त खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आमदार महेश सावंत, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, अनंत नर आणि हारुन खान यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, सोनम जामसुतकर, निशिकांत शिंदे या नगरसेवकांसह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कबड्डीप्रेमींच्या जल्लोषात वाघजाई क्रीडा मंडळाने राजाभाऊ देसाई स्मृती चषकावर आपले नाव कोरले आणि स्पर्धेचा शेवट दिमाखात झाला.


Post a Comment

0 Comments