Type Here to Get Search Results !

राज्य कॅरम स्पर्धेत अभिजित त्रिपनकर व सोनाली कुमारी विजेते! श्रमिक जिमखान्यावर सोंगट्यांचा थरार दमदार खेळातून पटकावले विजेतेपद सोंगट्यांच्या रणांगणावर अभिजित-सोनालीची सरशी

 


राज्य कॅरम स्पर्धेत अभिजित त्रिपनकर व सोनाली कुमारी विजेते!

श्रमिक जिमखान्यावर सोंगट्यांचा थरार

दमदार खेळातून पटकावले विजेतेपद

सोंगट्यांच्या रणांगणावर अभिजित-सोनालीची सरशी

 

मुंबई : मुंबईतील श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग येथे रंगलेल्या शिवशंकर उत्सव मंडळ आयोजित भारत पेट्रोलियम व न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स पुरस्कृत दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अंतिम लढतींमध्ये उच्च दर्जाचा थरार पाहायला मिळाला. पुरुष एकेरी गटात पुण्याचा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अभिजित त्रिपनकर याने अचूक स्ट्राईक आणि शांत रणनीतीच्या जोरावर विजेतेपद पटकावले, तर महिला एकेरीत मुंबईची युवा कॅरमपटू सोनाली कुमारी हिने जिद्दीच्या जोरावर शानदार विजय मिळवत स्पर्धेवर आपले नाव कोरले.

 

पुरुष अंतिम लढतीत अभिजितची एकतर्फी बाजी

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभिजित त्रिपनकर (पुणे) याने राहुल सोळंकी (मुंबई) याच्यावर २५-१३, २३-१२ असा एकतर्फी विजय मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अभिजितने सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले आणि प्रतिस्पर्ध्याला पुनरागमनाची संधीच दिली नाही.

 


तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत माजी विश्वविजेता संदीप दिवे (जळगाव) याने राजेश गोहिल (रायगड) यांना २३-१८, २५-६ असे हरवत तिसरे स्थान पटकावले.

 

महिला गटात सोनालीची चमकदार कामगिरी

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सोनाली कुमारी (मुंबई) हिने रिंकी कुमारी (मुंबई) हिला तीन सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत ११-२५, १६-१४, २५-८ असे पराभूत करत विजेतेपद पटकावले. पहिला सेट गमावल्यानंतर सोनालीने अप्रतिम पुनरागमन करत पुढील दोन सेट जिंकले आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

 

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात मिताली पाठक (मुंबई) हिने चैताली सुवारे (ठाणे) हिला १३-१२, १-२५, २५-० असे हरवत तिसरे स्थान मिळवले.

 

उपांत्य फेरीतील रंगतदार सामने

पुरुष एकेरी उपांत्य फेरीत राहुल सोळंकी (मुंबई) यांनी राजेश गोहिल (रायगड) यांना २५-९, २५-१५ असे हरवत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या सामन्यात अभिजित त्रिपनकर (पुणे) यांनी संदीप दिवे (जळगाव) यांना २५-११, १७-९ असे पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

महिला एकेरी उपांत्य फेरीत सोनाली कुमारी (मुंबई) हिने मिताली पाठक (मुंबई) हिला २५-१५, १८-२५, २५-१० असे हरवले. तर रिंकी कुमारी (मुंबई) हिने चैताली सुवारे (ठाणे) हिला २५-१८, ९-१९, १८-१७ अशा चुरशीच्या लढतीत मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला.

 


मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांच्या शुभहस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, शिवशंकर उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव प्रवीण चौधरी, प्रमुख कार्यवाह जितेंद्र चव्हाण, स्पर्धा प्रमुख कृष्णकांत परब, तसेच राष्ट्रीय कबड्डीपटू विजय घाडीगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

छायाचित्र माहिती

१)   डावीकडून : रिंकी कुमारी, सोनाली कुमारी, अभिजित त्रिपनकर, राहुल सोळंकी.
२) अभिजित त्रिपनकर व सोनाली कुमारी यांचा आमदार सुनील शिंदे व मान्यवरांसोबत सन्मान सोहळा.

३) अंतिम सामन्याचा थरारक क्षण.


Post a Comment

0 Comments