Type Here to Get Search Results !

राज्य कॅरम स्पर्धेत संदीप दिवे उपांत्य फेरीत! माजी विश्वविजेत्याची दमदार कामगिरी व्हाईट स्लॅमने प्रेक्षकांची मने जिंकली संदीप दिवेचा शानदार विजय

 


राज्य कॅरम स्पर्धेत संदीप दिवे उपांत्य फेरीत!

माजी विश्वविजेत्याची दमदार कामगिरी

व्हाईट स्लॅमने प्रेक्षकांची मने जिंकली

संदीप दिवेचा शानदार विजय

 

मुंबई : मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या भारत पेट्रोलियम व न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स पुरस्कृत शिवशंकर उत्सव मंडळ आयोजित दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात रोमांचक सामने रंगत आहेत. उपउपांत्य फेरीतील लढतीत जळगावचा माजी विश्वविजेता संदीप दिवे याने ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू झैद अहमद फारुकी याला २५-२१, २२-२५, २५-१ अशा तीन सेटच्या थरारक सामन्यात हरवत उपांत्य फेरीत धडक मारली. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सातव्या बोर्डावर संदीप दिवे याने व्हाईट स्लॅम साध्य करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

 

अभिजित त्रिपनकरची सरशी

पुरुष एकेरीतील दुसऱ्या महत्त्वाच्या लढतीत पुण्याचा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अभिजित त्रिपनकर याने आपल्या शहरातीलच सागर वाघमारे याला १३-२५, २१-१७, २३-९ अशा चुरशीच्या लढतीत हरवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. पहिला सेट गमावल्यानंतर त्रिपनकरने जबरदस्त पुनरागमन करत पुढील दोन सेट जिंकत विजय मिळवला.

 

महिला गटात रिंकी कुमारी व सोनाली कुमारीची चमक

महिला एकेरी उपउपांत्य फेरीत मुंबईच्या रिंकी कुमारी हिने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अंबिका हरिथ हिला २५-१२, १३-२१, १८-१६ अशा रोमांचक लढतीत पराभूत केले. तर दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या सोनाली कुमारी हिने कमाल करत या स्पर्धेतील प्रथम मानांकन प्राप्त ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकर हिला १६-१८, २०-१६, २५-८ अशा शानदार विजयासह स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

 

पुरुष उपउपांत्य फेरीतील इतर निकाल

पुरुष एकेरीतील इतर सामन्यांमध्ये राहुल सोळंकी (मुंबई) यांनी विकास धारिया (मुंबई) यांना १७-१२, २१-१५ असे हरवले. तर राजेश गोहिल (रायगड) यांनी प्रकाश गायकवाड (पुणे) यांच्यावर २१-१६, ७-२०, २१-१४ असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

 

महिला उपउपांत्य फेरीतील निकाल

महिला एकेरीत चैताली सुवारे (ठाणे) हिने आकांक्षा कदम (रत्नागिरी) हिला १३-१२, २५-४ असे हरवले. तर मिताली पाठक (मुंबई) हिने प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) हिला ५-२५, २५-७, २५-१ अशा दमदार कामगिरीसह पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश केला.

 

स्पर्धेची रंगत शिगेला

राज्यभरातील अव्वल कॅरमपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अचूक स्ट्राईक, रणनीती आणि एकाग्रतेच्या जोरावर खेळाडू उपांत्य फेरी गाठण्यासाठी झुंज देत आहेत. त्यामुळे पुढील सामने अधिकच रंगतदार होणार असल्याची उत्सुकता कॅरमप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.


Post a Comment

0 Comments