Type Here to Get Search Results !

एलिट गटात नानावटीची कोकिलाबेनवर ६८ धावांनी मात प्लेट विभागात नायर हॉस्पिटल विजेता दमदार खेळाने हॉस्पिटल संघांचा क्रिकेट जल्लोष

 


एलिट गटात नानावटीची कोकिलाबेनवर ६८ धावांनी मात 

प्लेट विभागात नायर हॉस्पिटल विजेता

दमदार खेळाने हॉस्पिटल संघांचा क्रिकेट जल्लोष

 

मुंबई : मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीत वैद्यकीय क्षेत्रातील क्रिकेटपटूंनीही आपली छाप उमटवत आंतर हॉस्पिटल गिरनार चहा’ चषक क्रिकेट स्पर्धेत जोरदार जल्लोष केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एलिट गटात नानावटी हॉस्पिटलने, तर प्लेट विभागात नायर हॉस्पिटलने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तब्बल १६ नामांकित हॉस्पिटल संघांच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धेत उत्साह, कौशल्य आणि स्पर्धात्मकतेचा संगम पाहायला मिळाला. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ ‘गिरनार चहा’ या स्पर्धेला प्रायोजकत्व देत असून त्यामुळे ही स्पर्धा मुंबईतील वैद्यकीय क्षेत्रातील क्रिकेटपटूंसाठी प्रतिष्ठेची मानली जाते.

 

एलिट गटात नानावटीची कोकिलाबेनवर दणदणीत मात

शिवाजी पार्क जिमखाना मैदानावर रंगलेल्या एलिट गटाच्या अंतिम सामन्यात नानावटी हॉस्पिटलने एकतर्फी वर्चस्व गाजवत कोकिलाबेन हॉस्पिटलचा ६८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नानावटी हॉस्पिटलने २० षटकांत २ बाद २०४ धावांचा डोंगर उभारला. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोकिलाबेन हॉस्पिटलचा संघ २० षटकांत ८ बाद १३६ धावांपर्यंतच मजल मारू शकला, आणि त्यामुळे नानावटीचा दणदणीत विजय निश्चित झाला.

 

प्लेट विभागात नायर हॉस्पिटलचा निर्णायक विजय

प्लेट विभागातील अंतिम सामन्यात नायर हॉस्पिटलने ब्रीच कँडी हॉस्पिटलवर निर्णायक विजय मिळवून विजेतेपद पटकावले. या लढतीत विजयासाठी नायर हॉस्पिटलसमोर १४१ धावांचे आव्हान होते. संयमी फलंदाजी आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर नायरच्या संघाने हे लक्ष्य गाठत प्लेट विभागाचा चषक आपल्या नावावर केला.

 

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन – राजदीप गुप्ता आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी चिटणीस – अभय हडप यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. या प्रसंगी खेळाडूंनी दाखवलेल्या उत्कृष्ट खेळाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

 

संघटनकर्त्यांची अथक मेहनत

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी एस. एच. जाफरी, अनिल बैकर, मिलिंद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे स्पर्धा सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

 

फोटो ओळ : प्लेट गटातील विजेता नायर हॉस्पिटलचा संघ – राजदीप गुप्ता यांच्या हस्ते चषक स्वीकारताना.


Post a Comment

0 Comments