Type Here to Get Search Results !

९ मार्चपासून ‘राजाभाऊ देसाई स्मृतीचषक’ कबड्डी स्पर्धा प्रभादेवीत चढाई-पकडींचा होणार महासंग्राम! राज्यातील १८ दिग्गज संघांमध्ये झुंज चवन्नी गल्ली पुन्हा बनली कबड्डीची पंढरी!

 



९ मार्चपासून ‘राजाभाऊ देसाई स्मृतीचषक’ कबड्डी स्पर्धा

प्रभादेवीत चढाई-पकडींचा होणार महासंग्राम!

राज्यातील १८ दिग्गज संघांमध्ये झुंज

चवन्नी गल्ली पुन्हा बनली कबड्डीची पंढरी!

 

मुंबई, (क्री. प्र.) : टी-२० क्रिकेटच्या फटकेबाजीचा थरार ओसरताच आता मुंबईत कबड्डीचा स्फोटक जल्लोष रंगणार आहे. प्रभादेवीतील स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आयोजित राजाभाऊ देसाई स्मृतीचषक’ राज्यस्तरीय निमंत्रित स्थानिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा ९ मार्चपासून रंगणार असून, राज्यातील १८ बलाढ्य स्थानिक संघ चढाई-पकडींच्या दमदार द्वंद्वात आमनेसामने भिडणार आहेत. या निमित्ताने प्रभादेवीची चवन्नी गल्ली पुन्हा एकदा कबड्डीची पंढरी बनली आहे.

 

परंपरेचा ठसा, दमदार आयोजन

कबड्डीला प्रो कबड्डीची झळाळी मिळण्याआधीपासूनच स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ देणाऱ्या ८३ वर्षांच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदाही भव्य आयोजन केले आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, आरसीएफ, बँक ऑफ महाराष्ट्र, सारस्वत बँक, मुथूट फायनान्स, आरबीएल बँक आणि बँक ऑफ इंडिया या नामांकित संस्थांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. त्यामुळे मुंबई शहरातील १२ संघांसह उपनगर, पुणे, नाशिक, नांदेड आणि रत्नागिरी येथील संघही या स्पर्धेत उतरले आहेत, अशी माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह व आमदार महेश सावंत यांनी दिली.

 

प्रो कबड्डी सुपरस्टार्सचा झंझावात

या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रो कबड्डी लीगमधील तब्बल ३० सुपरस्टार खेळाडू प्रभादेवीच्या मॅटवर झंझावाती खेळ सादर करणार आहेत. यात पंकज मोहिते (भारतीय रेल्वे), शुभम शिंदे, अजिंक्य पवार, अस्सल मुंबईकर संकेत सावंत, आकाश शिंदे (पुणेरी पलटण) आणि अजित चव्हाण (यू मुंबा) यांसारखे तडफदार खेळाडू आपल्या दमदार चढाया आणि भेदक पकडींनी चाहत्यांना रोमांचित करणार आहेत.

 

लाखोंची बक्षिसे – विजेता होणार लखपती

आगळ्या-वेगळ्या बक्षिसांसाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेत यंदाही आकर्षक इनामांची घोषणा करण्यात आली आहे. विजेत्या संघाला १,८३,००० रुपये रोख आणि चषक देऊन लखपती करण्यात येणार आहे. उपविजेता संघाला पाऊण लाख रुपये, तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी २५,००० रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम चढाईवीर आणि सर्वोत्तम पकडवीर यांनाही खास रोख पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडा प्रमुख संतोष सावंत यांनी दिली.

 

१८ संघांची दमदार फळी

या स्पर्धेत सहभागी संघांचे गट पुढीलप्रमाणे आहेत –

अ गट : सतेज संघ बाणेर (पुणे), अमर क्रीडा मंडळ (मुंबई शहर), गोल्फादेवी सेवा मंडळ (मुंबई शहर)

ब गट : विजय नवनाथ मंडळ (मुंबई शहर), विजय क्लब (मुंबई शहर), एसएसजी फाऊंडेशन (मुंबई शहर)

क गट : सिद्धीप्रभा फाऊंडेशन (मुंबई शहर), ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आडगाव (नाशिक), अंकूर स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर)

ड गट : वाघजाई क्रीडा मंडळ (रत्नागिरी), विजय भारत क्रीडा मंडळ (मुंबई शहर), शिवनेरी सेवा मंडळ (मुंबई शहर)

इ गट : स्वस्तिक क्रीडा मंडळ (उपनगर), मिडलाईन अ‍ॅकॅडमी (नांदेड), नवोदित संघ (मुंबई शहर)

फ गट : गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), भैरवनाथ क्रीडा मंडळ (पुणे), लायन्स स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर)

कबड्डीप्रेमींसाठी पर्वणी

प्रभादेवीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर राज्यातील सर्वोत्तम संघांचा दमदार खेळ पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना मिळणार आहे. स्थानिक क्लब संस्कृतीची ताकद आणि प्रो कबड्डीतील ग्लॅमर यांचा संगम घडवणारी ही स्पर्धा मुंबईतील कबड्डीप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने थरारक क्रीडा पर्वणी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments