Type Here to Get Search Results !

मैदानावर भावनांवर नियंत्रण ठेवा; खेळातून शिस्त शिका – दिलीप वेंगसरकर एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन कप १४ वर्षांखालील स्पर्धेत डिव्हाईन क्रिकेट अकादमीचा १० धावांनी थरारक विजय


 

मैदानावर भावनांवर नियंत्रण ठेवा; खेळातून शिस्त शिका – दिलीप वेंगसरकर

एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन कप १४ वर्षांखालील स्पर्धेत डिव्हाईन क्रिकेट अकादमीचा १० धावांनी थरारक विजय

 

मुंबई : युवा क्रिकेटपटूंनी मैदानावर खेळताना केवळ कौशल्य नव्हे तर भावनांवर नियंत्रण ठेवणे, शिस्त आणि खेळाप्रती निष्ठा जपणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट असल्याचा मोलाचा सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी दिला. पनवेल येथील दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या अकादमीच्या मैदानावर पार पडलेल्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन कप १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी रंगलेल्या अंतिम सामन्यात डिव्हाईन क्रिकेट अकादमीने स्पोर्ट्स फील्ड संघावर १० धावांनी रोमहर्षक विजय मिळवत विजेतेपद पटकावले आणि उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहा; पण चांगल्या गोष्टी आत्मसात करा

युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिलीप वेंगसरकर म्हणाले की, “तुम्ही टीव्हीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहता, मात्र त्यामधील केवळ आक्रमक हावभाव किंवा उत्स्फूर्त नाचण्याच्या शैलीचे अनुकरण करू नका. त्याऐवजी खेळाडूंची मेहनत, शिस्त, खेळण्याची कार्यपद्धती आणि विजयासाठीची जिद्द या गुणांचा अभ्यास करा आणि त्या गोष्टी आपल्या खेळात आत्मसात करा.” त्यांच्या या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित युवा क्रिकेटपटूंना नवी दिशा मिळाली.

 

लकी साकारियाची फिरकी जादू; डिव्हाईनचा डाव १०२ धावांत

अंतिम सामन्यात स्पोर्ट्स फील्ड संघाने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी डिव्हाईन क्रिकेट अकादमीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीला माधव ठाकरे ३३ आणि योहान बारुआ २१ यांनी ५१ धावांची सलामी देत डावाला चांगली सुरुवात करून दिली, तर विवान गुर्जर १६ धावांची भर घातली. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. लकी साकारिया याने अवघ्या १६ धावांत ४ बळी घेत घातक गोलंदाजी केली, तर रांचो तेरवे २० धावांत २ बळी, ओम लोखंडे २६ धावांत २ बळी आणि स्वरूप मोरे १८ धावांत २ बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा डाव ३१.१ षटकांत १०२ धावांत गुंडाळला.

 

रियाण तेरवेची झुंज व्यर्थ; डिव्हाईनचा जिद्दीने विजय

१०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पोर्ट्स फील्ड संघाकडून रियाण तेरवे याने ८ चौकारांसह ४९ धावांची झुंजार खेळी करत एकाकी लढा दिला. मात्र इतर फलंदाजांना फारशी साथ देता आली नाही. हृदान पाटील ९ धावांत ३ बळी आणि माधव ठाकरे ८ धावांत ३ बळी या माध्यमगती गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना रोखले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि दबावाखाली केलेल्या गोलंदाजीमुळे स्पोर्ट्स फील्डचा डाव ३६.५ षटकांत ९२ धावांत आटोपला आणि डिव्हाईन क्रिकेट अकादमीने १० धावांनी सनसनाटी विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

 

माधव ठाकरेचा दुहेरी जलवा; वैयक्तिक पुरस्कारांची लयलूट

अष्टपैलू कामगिरी करत माधव ठाकरे याने स्पर्धेत १११ धावा आणि ४ बळी मिळवत अंतिम सामन्यातील सामनावीर तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज हा मान पटकावला. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून लकी साकारिया ११ बळी, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आकाश कौशिक ८ झेल, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून रियाण तेरवे २३३ धावा आणि ५ बळी या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

 

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

या दिमाखदार सोहळ्यात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एच.डी.एफ.सी. बँकेचे वरिष्ठ सेल्स मॅनेजर बलकार सिंग, अदिती चौधरी यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रशिक्षक अमित जाधव आणि गायतोंडे यांच्यासह खेळाडूंच्या कुटुंबीयांचीही मोठी उपस्थिती होती.

 

संक्षिप्त धावफलक

डिव्हाईन क्रिकेट अकादमी – ३१.१ षटकांत सर्वबाद १०२ (योहान बारुआ २१, माधव ठाकरे ३३, विवान गुर्जर १६; लकी साकारिया १६ धावांत ४ बळी, रांचो तेरवे २०/२, ओम लोखंडे २६/२, स्वरूप मोरे १८/२); वि.वि. स्पोर्ट्स फील्ड – ३६.५ षटकांत सर्वबाद ९२ (रियाण तेरवे ४९; हृदान पाटील ९ धावांत ३ बळी, माधव ठाकरे ८ धावांत ३ बळी)

 

सामनावीर – माधव ठाकरे

 

फोटो ओळ : पनवेल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन कप १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या डिव्हाईन क्रिकेट अकादमी संघासोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एच.डी.एफ.सी. बँकेचे वरिष्ठ सेल्स मॅनेजर बलकार सिंग, अदिती चौधरी, प्रशिक्षक अमित जाधव आणि गायतोंडे.

Post a Comment

0 Comments