Type Here to Get Search Results !

क्रिकेटच्या पंढरीत टी-२०चा महासंग्राम! शिवाजी पार्क जिमखान्यात ‘मांजरेकर–देसाई’ स्मृती स्पर्धेचा होणार जल्लोष मुंबईतील १६ संघ आमनेसामने

 

क्रिकेटच्या पंढरीत टी-२०चा महासंग्राम!

शिवाजी पार्क जिमखान्यात ‘मांजरेकर–देसाई’ स्मृती स्पर्धेचा होणार जल्लोष

मुंबईतील १६ संघ आमनेसामने

 

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क जिमखाना (एस.पी.जी.) च्या ऐतिहासिक मैदानावर पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार उसळणार आहे! देशासाठी दिग्गज क्रिकेटपटू घडवणाऱ्या या भूमीत १५ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान रंगणार आहे कै. विजय मांजरेकर व कै. रमाकांत देसाई स्मृती टी-२० क्रिकेट स्पर्धा’, आणि यानिमित्ताने मुंबईतील अव्वल १६ संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.

 

क्रिकेटची परंपरा आणि दिग्गजांना मानवंदना

शिवाजी पार्क जिमखाना ही केवळ संस्था नसून क्रिकेटचे विद्यापीठच मानली जाते. येथून घडलेले महान खेळाडू आजही भारतीय क्रिकेटचा अभिमान आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखले जाणारे कै. विजय मांजरेकर आणि भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारे कै. रमाकांत देसाई या दोन दिग्गजांच्या अमूल्य योगदानाचा गौरव म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनाचा मान

स्पर्धेचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख मा. श्री. राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, या सोहळ्यामुळे स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयडीबीआय बँक मुख्य प्रायोजक तर एलआयसी सह-प्रायोजक म्हणून सहभागी आहेत.

 

१६ संघांचा दमदार सहभाग, चार मैदानांवर थरार

या टी-२० स्पर्धेत मुंबई परिसरातील एकूण १६ नामांकित संघ सहभागी होत आहेत.
त्यामध्ये शिवाजी पार्क जिमखाना, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, इस्लाम जिमखाना, पारशी जिमखाना, पी. जे. हिंदू जिमखाना, न्यू हिंद स्पोर्ट्स क्लब, एम.आय.जी. क्लब, पोलीस जिमखाना, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, नॅशनल क्रिकेट क्लब, डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, पोर्कोफीन क्रिकेटर्स, यंग महाराष्ट्र, कर्नाटक स्पोर्ट्स संघटना, न्यू हिंदू क्रिकेट क्लब आणि सिंध स्पोर्ट्स संघ यांचा समावेश आहे. हे सामने शिवाजी पार्क जिमखाना, यंग महाराष्ट्र, भारत क्रिकेट क्लब आणि बंगाल क्रिकेट क्लब या चार मैदानांवर सकाळ व दुपारच्या सत्रात खेळवले जाणार आहेत.

 

स्पर्धेचे वेळापत्रक : चार दिवसांचा क्रिकेट फेस्टिव्हल

१५ ते १८  एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.१० वाजेपर्यत सामने रंगणार आहेत. तर अंतिम सामना शनिवारी दुपारी १ ते ४:१० या कालावधीत पार पडणार आहे. तर ५ वाजता बक्षीस समारंभ सुरु होईल.    

 

आकर्षक बक्षिसांची लयलूट

विजेत्या संघाला ,००,०००/- उपविजेत्याला ५०,०००/- रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : २५,०००/-, सर्वोत्तम गोलंदाज : १०,०००/- सर्वोत्तम फलंदाज : १०,०००/- देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तर प्रत्येक सामन्यात सामनावीर पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहे.

 

सन्मानाचा क्षण : दिग्गजांचा गौरव

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास माजी कसोटीपटू संदीप पाटील प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. तसेच, माधव गोठोस्कर (माजी आंतरराष्ट्रीय पंच) आणि चंद्रकांत पाटणकर (माजी कसोटीपटू) यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी

या स्पर्धेमुळे अनुभवी खेळाडूंसोबतच उदयोन्मुख युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. शिवाजी पार्कच्या साक्षीने पुन्हा एकदा भविष्यातील क्रिकेट तारे घडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

क्रिकेटप्रेमींनो, सज्ज व्हा!

शिवाजी पार्कवर रंगणाऱ्या या टी-२० महोत्सवात चौकार-षटकारांचा पाऊस आणि थरारक लढतींचा अनुभव घ्यायाला नक्कीच हजेरी लावायला हवे.




Post a Comment

0 Comments