Type Here to Get Search Results !

बंड्या मारूती कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा भारत पेट्रोलियम, युनियन बँक, मुंबई बंदर, युवा पलटनची विजयी सलामी! मिलन दहिया, सुशील खांबरे, साईल पाटील आणि किशोर जाट चमकले श्रमिक जिमखान्यावर रंगला कबड्डीचा थरार पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात; दिग्गज संघांचा विजयघोष!


बंड्या मारूती कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा

भारत पेट्रोलियम, युनियन बँक, मुंबई बंदर, युवा पलटनची विजयी सलामी!

मिलन दहिया, सुशील खांबरे, साईल पाटील आणि किशोर जाट चमकले

श्रमिक जिमखान्यावर रंगला कबड्डीचा थरार

पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात; दिग्गज संघांचा विजयघोष!


मुंबई : मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू झालेल्या बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील संघांनी आपला दबदबा सिद्ध केला. भारत पेट्रोलियम, युनियन बँक, मुंबई बंदर आणि युवा पलटन (इनशोअरकोट प्रा. लि.) यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शानदार विजयी सलामी दिली. बंड्या मारूती मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या स्पर्धेने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना रोमांचित केले.

 

भारत पेट्रोलियमचा दणदणीत विजय; मिलन दहियाची ११ गुणांची कमाल

ब गटातील सामन्यात भारत पेट्रोलियम ने मुंबई पोस्टल वर ४५-२५ असा एकतर्फी विजय मिळवत साखळीत पहिला विजय नोंदविला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत पूर्वार्धात लोण देत पेट्रोलियमने २२-१५ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी दोन लोण देत सामना तब्बल २० गुणांच्या फरकाने आपल्या नावावर केला. मिलन दहिया याने चढाईत ११ गुण घेत विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला चेतन साहू आणि अनिल जस्ता यांनी प्रत्येकी ७-७ गुण, तर तुषार आढवले यांनी ४ पकडी आणि योगेश दहिया यांनी ३ पकडी करत भक्कम साथ दिली. मुंबई पोस्टलकडून अर्जुन धंदाल याने ९ गुण, तर यश सैगावकर यांनी ४ पकडी करत लढत दिली.

 


युनियन बँकेची अर्धशतकी कामगिरी; सुशील खांबरेचा तुफानी खेळ

ड गटातील सामन्यात युनियन बँक ने जयपूर पिंक क्लब ला ५४-३६ असे नमवले. पहिल्या डावात लोण देत २०-१८ अशी नाममात्र आघाडी घेतलेल्या बँकेने दुसऱ्या डावात जोशपूर्ण खेळ करत तब्बल ३ लोण चढवीत अर्धशतक पार केले. सुशील खांबरे याने तुफानी चढाया करत तब्बल २४ गुणांची कमाई केली. त्याला आदित्य पोवार यांनी ५ पकडी, तर रोहित तुपारे यांनी ४ पकडी करत उत्कृष्ट साथ दिली. जयपूरकडून नितीन धनकर याने १४ गुण घेत एकाकी झुंज दिली, मात्र बचाव दुबळा ठरला.

 

मुंबई बंदरची मजबूत कामगिरी; साईल पाटील आणि रवि भती चमकले

क गटात मुंबई बंदर ने तामील थलवाईस चा ५१-३९ असा प्रतिकार मोडून काढला. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केल्याने मध्यंतराला २३-२१ अशी आघाडी मुंबई बंदरकडे होती. पूर्वार्धात दोन्ही संघांनी १-१ लोण नोंदविले होते. उत्तरार्धात साईल पाटील याने चढाईत १३ गुण, सौरभ राऊत याने ९ गुण, तर रवि भती याने ६ पकडी करत संघाला विजय मिळवून दिला. तामील थलवाईसकडून गौरव याने ११ गुण, तर सौरभ याने ८ गुण घेत चांगली झुंज दिली; मात्र उत्तरार्धात ते ढेपाळले.

 

युवा पलटनचा कमबॅक; किशोर जाट, नीरज मिसळ, वैभव रबाडे यांची कमाल

अ गटातील सामन्यात युवा पलटन (इनशोअरकोट प्रा. लि.) ने मिडलाईन वर ३९-३३ असा शानदार विजय मिळविला. विश्रांतीला २३-२४ अशा पिछाडीवर असतानाही उत्तरार्धात जबरदस्त कमबॅक करत युवा पलटनने विजय साकारला. किशोर जाट, नीरज मिसळ आणि वैभव रबाडे यांच्या धूर्त आणि संयमी खेळामुळे हा विजय शक्य झाला. मिडलाईनकडून हर्ष याने लक्षवेधी खेळ केला.

 


आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

या भव्य स्पर्धेचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्याला कबड्डीप्रेमींची मोठी गर्दी झाली होती.

 

महाराष्ट्राच्या संघांची दमदार सुरुवात!

पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील संघांनी वर्चस्व गाजवत स्पर्धेचा रंगतदार प्रारंभ केला आहे. पुढील सामन्यांमध्ये आणखी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार असून, कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा खरी पर्वणी ठरत आहे.


Post a Comment

0 Comments