Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज चषकासाठी राणा प्रताप तिवारी यांची अधिकृत निवेदकपदी निवड! नागपूरच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दमदार आवाजाची साथ; ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान रंगणार महासंग्राम नागपूरमध्ये कबड्डीचा जल्लोष; राणा प्रताप तिवारी यांच्यावर निवेदनाची जबाबदारी

 


छत्रपती शिवाजी महाराज चषकासाठी राणा प्रताप तिवारी यांची अधिकृत निवेदकपदी निवड!

नागपूरच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दमदार आवाजाची साथ; ३० एप्रिल ते ६ मे दरम्यान रंगणार महासंग्राम

नागपूरमध्ये कबड्डीचा जल्लोष; राणा प्रताप तिवारी यांच्यावर निवेदनाची जबाबदारी


नागपूर : नागपूरच्या क्रीडाविश्वासाठी अभिमानाची आणि कबड्डीप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरली आहे! क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नागपूर विभाग यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२५-२६’ साठी अनुभवी आणि अभ्यासू निवेदक राणा प्रताप तिवारी यांची अधिकृत निवेदक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या दमदार आवाजामुळे आणि प्रभावी शैलीमुळे या भव्य स्पर्धेला अधिक रंगत येणार आहे.

 

३० एप्रिलपासून सेवानंद हायस्कूल, कोराडी येथे रंगणार राज्यस्तरीय थरार

सेवानंद हायस्कूल, कोराडी, ता. कामठी, जि. नागपूर येथे ३० एप्रिल ते ६ मे या कालावधीत ही प्रतिष्ठेची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित कबड्डी संघ आणि खेळाडू सहभागी होणार असून, कबड्डीचा रोमांचक संघर्ष अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेत राणा प्रताप तिवारी निवेदक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.

 

शासनाचे विशेष लक्ष; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन

या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे तसेच नागपूरचे जिल्हाधिकारी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. शासनाच्या पातळीवर विशेष लक्ष दिले जात असल्याने स्पर्धेच्या नियोजनाला वेग आला असून, संपूर्ण क्रीडा वर्तुळाचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे.

 

पल्लवी धात्रक यांच्याकडून अधिकृत घोषणा

स्पर्धेच्या नियोजनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पल्लवी धात्रक (उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा तथा कोषाध्यक्ष, स्पर्धा समिती) यांनी अधिकृत पत्राद्वारे राणा प्रताप तिवारी यांच्या निवडीची घोषणा केली. त्यांच्या निवडीमुळे स्पर्धेच्या दर्जात आणखी भर पडणार असल्याचे क्रीडावर्तुळातून बोलले जात आहे.

 

स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह; तिवारींच्या आवाजाची पर्वणी

अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नागपूरमध्ये अशा स्वरूपाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत असल्याने स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे. विशेष म्हणजे राणा प्रताप तिवारी यांच्या अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि ऊर्जावान निवेदनाचा लाभ या स्पर्धेला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी ही खरी पर्वणी ठरणार आहे.

 

कबड्डीच्या रंगमंचावर आवाजाचीही तितकीच ताकद!

कबड्डीचा थरार जितका मॅटवर दिसतो, तितकाच तो निवेदकाच्या आवाजातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. अशा वेळी राणा प्रताप तिवारी यांची निवड ही स्पर्धेसाठी निश्चितच मोठी जमेची बाजू ठरणार आहे. आता नागपूर सज्ज झाले आहे कबड्डीच्या रणांगणासाठी आणि तिवारींच्या दमदार आवाजासाठी!


Post a Comment

0 Comments