ठाण्याचा जल्लोष! झैद अहमद – समृद्धी घाडीगावकर
राज्य कॅरम विजेते
वाशीतील ६० व्या
राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्याचे वर्चस्व रोमांचक अंतिम लढतींनी रंगला समारोप
कॅरम स्पर्धेचा थरार शिगेला!
नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे पार पडलेल्या ६० व्या वरिष्ठ राज्य
अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचा समारोप थरारक आणि दिमाखदार झाला. महाराष्ट्र कॅरम
असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत
ठाण्याच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध करत विजेतेपदांवर शिक्कामोर्तब केले.
झैद अहमदचा दमदार विजय; अभिजितवर मात
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमद याने पुण्याच्या अभिजित त्रिपनकर याचा १९-२३, २५-१०, २५-६ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिला सेट
गमावूनही झैदने जबरदस्त पुनरागमन करत पुढील दोन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. तिसऱ्या
क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जळगावच्या संदीप दिवे याने मुंबईच्या सौरभ मते याच्यावर २३-१, २५-९ असा एकतर्फी विजय मिळवला.
समृद्धी घाडीगावकरची सरशी; श्रुतीवर सहज विजय
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ठाण्याची समृद्धी घाडीगावकर हिने पालघरच्या श्रुती सोनावणे हिला २१-६, २५-९ असे सहज नमवत विजेतेपद मिळवले.
तिसऱ्या स्थानासाठी मुंबईच्या निलम घोडके हिने ऐशा साजिद खान हिच्यावर २५-६, २५-१४ असा विजय मिळवून आपली छाप पाडली.
वयस्कर पुरुष गटात संजय थिटे अव्वल
वयस्कर पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या संजय थिटे यांनी मुंबईच्या सत्यनारायण
दोंतुल्ला यांना २०-१९, २५-१३ असे हरवत विजेतेपद पटकावले.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात
पुण्याच्या फय्याज शेख यांनी मुंबईच्या हेमंत पांचाळ यांना २२-८, २०-१९ अशा काठावरच्या लढतीत पराभूत केले.
शोभा कामतचे ८ वे विजेतेपद; रोमांचक महिला वयस्कर अंतिम
महिला वयस्कर एकेरी गटात कोल्हापूरच्या शोभा कामत यांनी आपले ८ वे राज्य
विजेतेपद पटकावताना मुंबई उपनगरच्या माधुरी तायशेटे हिला २५-४, १४-१५, २५-९ असे पराभूत केले. तिसऱ्या स्थानासाठी मुंबईच्या रोझिना गोदाद हिने ठाण्याच्या मीनल लेले खरे हिला १३-१२, २४-७ असे हरवले.
उत्कृष्ट आयोजन; सिस्का बोर्डांचा वापर
या स्पर्धेत सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम बोर्ड आणि उत्कृष्ट सोंगट्यांचा वापर करण्यात आला.
स्पर्धेची गुणवत्ता आणि वेगवान खेळ यामुळे प्रेक्षकांना उच्च दर्जाचा अनुभव
मिळाला.
मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
विजेत्यांना विजय एस. पाटील, विजय आर. पाटील, सी.ए. संजय निकम, प्रकाश श्रीनिवासन, अरुण केदार, अजित सावंत व जितेंद्र दळवी यांच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व चषक देण्यात आले. यावेळी कविता गांगुली, सी.ए. समीर गवळी, राजू शिंदे व अशोक पाटील उपस्थित होते.
पंच परीक्षेचा निकाल जाहीर; नव्या संधींचा मार्ग मोकळा
या प्रसंगी केतन चिखले यांनी पंच परीक्षेचा निकाल जाहीर करत शैलेश वाघाटे
(रत्नागिरी) व रोहित कदम (पुणे) हे उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. भविष्यात नवी
मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यास सज्ज असल्याचे विजय एस. पाटील व विजय आर. पाटील यांनी स्पष्ट
केले.
वाशीतील या भव्य स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी
गाजवलेला दबदबा, अनुभवी आणि नवोदित खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि रंगलेल्या
थरारक लढतींमुळे कॅरमविश्वात नव्या उंचीची नोंद झाली!

Post a Comment
0 Comments