Type Here to Get Search Results !

एस. आय. ई. एस.ची अंतिम फेरीत धडक नवरत्न मंडळाची उपांत्य फेरीत दमदार एन्ट्री! आस्था सिंग-आर्या देवकर यांचा तुफानी खेळ रोहन शेडगे-गौरव पाटील यांच्या कामगिरीने नवरत्नचा विजय पक्का! विक्रोळीतील कबड्डी स्पर्धेत थरार शिगेला महिलांत एस. आय. ई. एस.चा दबदबा, पुरुषांत नवरत्नची जोरदार मजल!


एस. आय. ई. एस.ची अंतिम फेरीत धडक

नवरत्न मंडळाची उपांत्य फेरीत दमदार एन्ट्री!

आस्था सिंग-आर्या देवकर यांचा तुफानी खेळ

रोहन शेडगे-गौरव पाटील यांच्या कामगिरीने नवरत्नचा विजय पक्का!

विक्रोळीतील कबड्डी स्पर्धेत थरार शिगेला

महिलांत एस. आय. ई. एस.चा दबदबा, पुरुषांत नवरत्नची जोरदार मजल!

 

मुंबई : टागोर नगर मित्र मंडळ आयोजित स्पर्धेत मॅटवर रंगलेल्या झंझावाती लढतींमध्ये एस. आय. ई. एस. संघाने महिलांत अंतिम फेरी गाठत विजेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतली, तर पुरुष गटात नवरत्न मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश करत स्पर्धेतील आपली ताकद अधोरेखित केली.

 

एस. आय. ई. एस.ची अंतिम फेरीकडे झेप

महिलांच्या उपांत्य फेरीत कुर्ल्याच्या एस. आय. ई. एस. संघाने आरंभ स्पोर्टस् वर सहज मात करत अंतिम फेरी गाठली. आस्था सिंग आणि आर्या देवकर यांच्या तुफानी खेळामुळे सामना एकतर्फी झाला. आरंभ मंडळाकडून मोनिका शिवगण हिने झुंजार खेळ करत चमक दाखवली. याआधीच्या सामन्यात आरंभ मंडळाने मोनिका शिवगण आणि साक्षी शिगवण यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर घाटकोपरच्या निर्विघ्न संघाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.

 

नवरत्न मंडळाची उपांत्य फेरीत धडक

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात विक्रोळीच्या नवरत्न मंडळाने कांजूरच्या सत्यम सेवा संघावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. आक्रमक सुरुवात करत नवरत्नने विश्रांतीला १४-०७ अशी आघाडी घेतली आणि नंतर संयमी खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहन शेडगे आणि गौरव पाटील यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळामुळे हा विजय साकारला. सत्यमकडून ऋग्वेद तोरसकर याने दुसऱ्या डावात लढाऊ खेळ केला.

 


चेंबूर क्रीडा केंद्राची शानदार पुनरागमन

दुसऱ्या फेरीतील सामन्यात चेंबूर क्रीडा केंद्राने घाटकोपरच्या अमरज्योत मंडळाचा कडवा प्रतिकार मोडून काढला. मध्यंतराला १२-१५ अशी पिछाडी असतानाही चेंबूरने उत्तरार्धात टॉप गिअर टाकत ५ गुणांनी सामना जिंकला. कुणाल पवार आणि शुभम गौतम यांच्या झंझावाती खेळामुळे हा विजय शक्य झाला. अमरज्योतकडून संकेत मोरे याचा खेळ उत्तरार्धात ढासळला.

 

सत्यम संघाची पुढील फेरीत मजल

इतर सामन्यात सत्यम संघाने उत्कर्ष मंडळावर विजय मिळवत पुढील फेरी गाठली, आणि स्पर्धेतील स्पर्धात्मकता आणखी वाढवली आहे.


Post a Comment

0 Comments