मुंबईच्या बॉडीबिल्डर्सचा ‘मसल्स महोत्सव’
आयर्न पॅराडाईज जिमतर्फे राष्ट्रीय पदक
विजेत्यांचा भव्य सत्कार सोहळा
१४ पदक विजेत्यांचा भव्य गौरव सोहळा!
नव्या पिढीला प्रेरणा; ताकदीचा तडाखा, यशाचा जल्लोष!
मुंबई : राष्ट्रीय
शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा आपल्या ‘मसल पॉवर’चा
जबरदस्त तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले! तब्बल १४ पदकांची
दणदणीत कमाई करत “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख अधिक
ठळक केली. या ऐतिहासिक यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणेचा
नवा मार्ग दाखवण्यासाठी कुणाल केरकर यांच्या पुढाकारातून १८ एप्रिल रोजी भव्य सत्कार सोहळा रंगणार आहे.
भव्य सोहळा : परंपरेचा दिमाखदार गौरव
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व
फिटनेस संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड (पश्चिम) येथील आयर्न पॅराडाईज जिममध्ये हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मंचावर
केवळ विजेत्यांचा सन्मानच नव्हे, तर मुंबईच्या शरीरसौष्ठव परंपरेचा गौरवशाली इतिहासही साजरा
केला जाणार आहे.
कुणाल केरकर यांची पुढाकार : २५ वर्षांची फिटनेस
साधना
गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट
कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी
या उद्देशाने हा उपक्रम उभा केला आहे. या उपक्रमाला संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, तसेच किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सुवर्ण झंकार : राष्ट्रीय विजेत्यांची दमदार
कामगिरी
राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक विजेता किताब पटकावणाऱ्या हरमीत सिंगने सर्वोच्च कामगिरी करत बाजी मारली, तर उमेश गुप्ताने उपविजेतेपद मिळवत आपली छाप पाडली. महिला गटात रेखा शिंदेने उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच राजेश तारवे, संदीप सावळे, निलेश दगडे, विश्वंभर राऊळ (क्लासिक शरीरसौष्ठव) आणि नीलेश गुरव
(मेन्स फिजिक) यांनी सुवर्णपदक जिंकत मुंबईचा झेंडा उंचावला.
रौप्य आणि कांस्य कामगिरी : सातत्यपूर्ण यशाचा
ठसा
रौप्यपदक विजेत्यांमध्ये गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे आणि अविनाश शिंदे (क्लासिक बॉडीबिल्डिंग) यांनी उल्लेखनीय
कामगिरी केली. तर कांस्यपदक विजेता निलेश रेमजेनेही आपल्या दमदार प्रदर्शनाने लक्ष वेधून घेतले.
विशेष गौरव : राज्यस्तरीय विजेत्यांचा सन्मान
या सोहळ्यात प्रशांत घोलम (मुंबई श्री, महाराष्ट्र श्री – सुवर्ण), सिद्धांत यादव (रौप्य) आणि क्षितिज साळुंखे (कांस्य) यांचा विशेष
सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण यशाने राज्य आणि राष्ट्रीय
स्तरावर मुंबईची ताकद अधोरेखित केली आहे.
नव्या पिढीसाठी प्रेरणेचा मंच
हा भव्य सत्कार सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित
नसून, तो नव्या पिढीला
प्रेरणा देणारा आणि शरीरसौष्ठव क्षेत्रात करिअर घडवण्याची नवी दिशा दाखवणारा ठरणार
आहे. मुंबईच्या बॉडीबिल्डर्सनी घडवलेला हा यशाचा ‘मसल्स महोत्सव’ पुढील अनेक
खेळाडूंना नवी उंची गाठण्याची प्रेरणा देईल, यात शंका नाही!

Post a Comment
0 Comments