Type Here to Get Search Results !

आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमची समाजसेवेची उज्ज्वल परंपरा हिवाळी शाळेला नवे जीवन! सेवाभावातून साकारले शिक्षणाचे मंदिर!


आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमची समाजसेवेची उज्ज्वल परंपरा

हिवाळी शाळेला नवे जीवन!

सेवाभावातून साकारले शिक्षणाचे मंदिर!

 

मुंबई : सेवानिवृत्तीनंतरही समाजाशी नाळ न तोडता, उलट अधिक जोमाने समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणादायी परंपरा जपत आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमने नाशिक जिल्ह्यातील दुर्गम हिवाळी गावात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. च्या माजी कर्मचाऱ्यांनी उभारलेला हा सेवाभावी उपक्रम आज आदिवासी मुलांच्या भविष्यास नवी दिशा देणारा ठरत आहे.

 

१९ वर्षांची अखंड समाजसेवा

भारत सरकारच्या खत उद्योगातील प्रतिष्ठित कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या या फोरमने गेली १९ वर्षे सातत्यपूर्ण सामाजिक कार्य केले आहे. सेवानिवृत्त सहकाऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभी राहिलेली ही संस्था विविध उपक्रमांद्वारे समाजहित जपते आहे.

 

हिवाळी शाळेत नवे शैक्षणिक सभागृह

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी फोरमने ६०X६० व ३०X३० आकाराचे दोन शैक्षणिक सभागृह उभारले असून, शाळेच्या प्रांगणात आकर्षक रंगरंगोटी व भिंतीवर शैक्षणिक चित्रे साकारली आहेत. या उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, १० एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

या कार्यक्रमाचे उद्घाटन आरसीएफचे विपणन संचालक निरंजन सोनक यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उदय शंकर झा असतील. यावेळी शिवाजीराव पाटील, सुरेश भोसले, केशव गावित, अजय शर्मा, भगवान चव्हाण, महेश पाटील, दिलीप चव्हाण आणि व्ही. डी. पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

नाविन्यपूर्ण शिक्षणाची अद्भुत किमया

केशव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही शाळा म्हणजे नवोपक्रमांचे जिवंत उदाहरण आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८, वर्षातील ३६५ दिवस चालणाऱ्या या शाळेत विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हातांनी दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये लेखन करतात. तसेच ते २०० पर्यंतचे पाढे सहज म्हणतात. अभ्यासाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, खेळ, वनीकरण आणि पशुपालन यांचेही ज्ञान दिले जाते.

 

मर्यादित साधनांत मोठी कामगिरी

फक्त ५५ विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि केवळ २ शिक्षक असतानाही ही शाळा आदिवासी मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाचे केंद्र बनली आहे. कौशल्य आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढीस लागली आहे.

 

गरज ओळखून तातडीची मदत

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा लक्षात घेऊन, शाळा व्यवस्थापनाने सभागृह व रंगकामाची मागणी केली होती. यावर तातडीने प्रतिसाद देत आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमने आवश्यक साहित्य पुरवून आणि बांधकाम पूर्ण करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

 

समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

दीपक सालवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उपक्रम केवळ बांधकामापुरता मर्यादित नसून, ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षण उन्नतीसाठी एक प्रेरणादायी पाऊल आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांत सहभाग घेतल्यास शिक्षणाची खरी क्रांती घडू शकते.

 


Post a Comment

0 Comments