रोटरी क्लब राज्य कॅरम स्पर्धेत संजय-निलांशची दमदार
एन्ट्री
उपांत्य फेरीत धडाकेबाज प्रवेश!
चुरशीच्या लढतीत अनुभवीपणाचा विजय
समृद्धी घाडिगावकरचीही उपांत्य फेरीत धडाकेबाज एंट्री
मुंबई : कॅरमपटूंच्या कौशल्य, संयम आणि अचूकतेचा जबरदस्त संगम अनुभवायला मिळत असताना
रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा आता रंगतदार
टप्प्यावर पोहोचली आहे. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल,
विलेपार्ले येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्य फेरीत
संजय मांडे
आणि निलांश चिपळूणकर यांनी थरारक विजय मिळवत उपांत्य फेरीत दमदार प्रवेश करत
प्रेक्षकांची मने जिंकली.
अनुभवी संजय मांडेचा कमबॅक विजय
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीत ठाण्याचे अनुभवी आंतरराष्ट्रीय
कॅरमपटू संजय मांडे यांनी आपल्या अनुभवाचा जबरदस्त वापर करत मुंबईच्या फॉर्मात
असलेल्या राष्ट्रीय खेळाडू विकास धारिया याला पराभूत केले. पहिला सेट १४-१९ असा गमावल्यानंतर संजय यांनी जोरदार पुनरागमन करत पुढील सेट
१७-१५ आणि २०-१९ असे जिंकत शानदार विजय नोंदवला. हा सामना प्रेक्षकांसाठी
रोमांचक ठरला.
निलांश चिपळूणकरचा थरारक निसटता विजय
दुसऱ्या उपउपांत्य लढतीत मुंबईच्या निलांश चिपळूणकर यांनी कृष्णा वाघमारे विरुद्ध रंगलेल्या तिन सेटच्या लढतीत १०-२०, २५-३, २५-२४ असा निसटता विजय मिळवला. शेवटच्या सेटमध्ये झालेली चुरस आणि
निलांशचा संयम यामुळे हा सामना विशेष आकर्षण ठरला.
महिला गटात समृद्धी घाडिगावकरची सरशी
महिला एकेरी उपउपांत्य फेरीत प्रथम मानांकित ठाण्याची
समृद्धी घाडिगावकर
हिने मुंबईच्या अंबिका हरिथ हिला सहज पराभूत करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित
केले. तिच्या अचूक खेळामुळे ती अजूनही विजेतेपदाची प्रमुख दावेदार ठरत आहे.
इतर गटातील लढतींचे निकाल
पुरुष एकेरी गटात प्रशांत मोरे (मुंबई) विरुद्ध सज्जाद शेख (मुंबई उपनगर) तसेच रहीम खान (पुणे) विरुद्ध राहुल सोळंकी (मुंबई) यांच्यातील सामनेही चुरशीचे झाले. महिला गटात
सोनाली कुमारी (मुंबई)
विरुद्ध उर्मिला शेंडगे (मुंबई), मिताली पाठक (मुंबई) विरुद्ध प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) आणि ऐशा साजिद खान (मुंबई) विरुद्ध चैताली सुवारे (ठाणे) या लढतींनी स्पर्धेची रंगत अधिक वाढवली.
स्पर्धेचा थरार शिगेला
उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या स्पर्धेत
प्रत्येक सामना अत्यंत रोमांचक होत असून, विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे.
अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या संघर्षामुळे ही स्पर्धा कॅरमप्रेमींसाठी खऱ्या
अर्थाने एक क्रीडामहोत्सव ठरत आहे.

Post a Comment
0 Comments