Type Here to Get Search Results !

ओम् ज्ञानदीप कबड्डी स्पर्धेचा धमाका! प्रो-कबड्डी स्टार्सचा थरार, बक्षिसांची लयलूट सर्वोत्तम खेळाडूस “मोटरबाईक”, विजेत्या संघास ₹१५००००/- प्रभादेवीत रंगणार कबड्डीचा जल्लोष कबड्डी रसिकांसाठी पर्वणीच!


 

ओम् ज्ञानदीप कबड्डी स्पर्धेचा धमाका!

प्रो-कबड्डी स्टार्सचा थरार, बक्षिसांची लयलूट

सर्वोत्तम खेळाडूस “मोटरबाईक”, विजेत्या संघास १५००००/-

प्रभादेवीत रंगणार कबड्डीचा जल्लोष

कबड्डी रसिकांसाठी पर्वणीच!


मुंबई : मुंबईतील कबड्डी रसिकांसाठी एप्रिल महिना ठरणार आहे अक्षरशः थराराचा आणि जल्लोषाचा! ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा, प्रभादेवी-२०२६ ही स्पर्धा म्हणजे कबड्डीप्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. १४ ते १७ एप्रिल २०२६ दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत प्रो-कबड्डी स्टार खेळाडूंचा झंझावाती खेळ प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, बक्षिसांची अक्षरशः खैरातच करण्यात आली आहे.

 

आयोजन व स्पर्धेचे स्वरूप – दोन मॅटवर झगमगता थरार

महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा वरळी, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर पार पडणार आहे. विशेष म्हणजे, मॅटच्या २ क्रीडांगणांवर सायंकाळी प्रखर विद्युत झोतात सामने रंगणार आहेत. स्पर्धा प्रथम साखळी पद्धतीने व त्यानंतर बाद फेरीत खेळवली जाणार असल्याने प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.

 

नामांकित संघांचा सहभाग – दिग्गजांची लढत रंगणार

या स्पर्धेत मुंबई व महाराष्ट्रातील नामांकित व्यावसायिक संघांचा सहभाग असणार आहे. भारत पेट्रोलियम, युवा पलटण, मध्य रेल्वे, युनियन बँक, मुंबई बंदर, न्यू इंडिया एन्शुरन्स, मुंबई पोस्टल, सी. जी. एस. टी., पश्चिम रेल्वे, रूपाली ज्वेलस, सचिवालय जिमखाना, स्वामी समर्थ स्पोर्टस् या बलाढ्य संघांसोबतच डी. पी. यु. पुणे, ठाणे महानगर पालिका, एच. ए. एल. नाशिक यांसारखे नामवंत संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामन्यात चुरस, कौशल्य आणि रोमांच यांचा मिलाफ पाहायला मिळणार आहे.

 

बक्षिसांची लयलूट – खेळाडूंवर पुरस्कारांचा वर्षाव

या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक बक्षिसांची रेलचेल! अंतिम विजेत्या संघाला १५००००/- व चषक, उपविजेत्या संघाला १०००००/- व चषक, तर उपांत्य फेरीतील दोन्ही संघांना प्रत्येकी ५००००/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस “मोटरबाईक”, उत्कृष्ट चढाई व पकडीतील खेळाडूंना प्रत्येकी वॉशिंग मशिन”, तर दररोजच्या मानकरी खेळाडूस एल.इ.डी. टी.व्ही.” प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास “ट्रॉली बॅग” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

प्रेक्षकांसाठीही खास आकर्षण – दररोज ५ लकी ड्रॉ!

फक्त खेळाडूच नव्हे, तर प्रेक्षकांनाही या स्पर्धेत खास संधी मिळणार आहे. दररोज ५ लकी ड्रॉ काढून उपस्थित क्रीडा रसिकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मैदानात उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकासाठी हा अनुभव अधिकच रंगतदार ठरणार आहे.

 

आयोजकांची माहिती – स्पर्धेबाबत अधिकृत घोषणा

या भव्य स्पर्धेबाबत माहिती देताना मंडळाचे सचिव रोहित वारेकर यांनी सांगितले की, “ही स्पर्धा कबड्डी खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी असून, प्रेक्षकांना उच्च दर्जाचा खेळ अनुभवता येईल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.”

 

 

Post a Comment

0 Comments