Type Here to Get Search Results !

वेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता-पल्लवीचा दमदार झंकार राष्ट्रीय पातळीवर कांस्य पदकांची कमाई अनुभवी खेळाडूंची शानदार कामगिरी

 


वेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता-पल्लवीचा दमदार झंकार

राष्ट्रीय पातळीवर कांस्य पदकांची कमाई

अनुभवी खेळाडूंची शानदार कामगिरी

 

मुंबई : मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात रंगलेल्या वेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल यांनी अप्रतिम खेळाचे दर्शन घडवत कांस्य पदकांची कमाई केली. देशभरातील अनुभवी खेळाडूंमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत दोघींनीही जिद्द, कौशल्य आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत मुंबईच्या क्रीडा क्षेत्राचा झेंडा उंचावला.

 

मिश्र दुहेरीत श्वेता ठाकूरची प्रभावी कामगिरी

३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी गटात श्वेता ठाकूर हिने अभिनव प्रकाशसोबत खेळताना उत्कृष्ट समन्वय आणि आक्रमक खेळाच्या जोरावर कांस्य पदक पटकावले. उपांत्य फेरीत केरळच्या मोहम्मद रेहान अनिस कौसर या बलाढ्य जोडीकडून ठाकूर-प्रकाश जोडीला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे याच जोडीने पुढे विजेतेपद मिळवले. या गटात एकूण ६८ जोड्यांचा सहभाग होता, ज्यामध्ये श्वेताने आपली गुणवत्ता ठसवली.

 

श्वेता ठाकूरचा सातत्यपूर्ण यशाचा आलेख

श्वेता ठाकूर या उज्वल इंटरनॅशनल कंपनीमध्ये संचालक पदावर कार्यरत असून क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी संतुलन साधले आहे. यापूर्वी आग्रा येथे झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत त्यांनी महिला दुहेरीत कांस्य, तर २०२५ मध्ये झालेल्या सी.सी.आय. महाराष्ट्र राज्य स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्या वेटरन्स गटात एक मजबूत खेळाडू म्हणून ओळख निर्माण करत आहेत.

 

महिला दुहेरीत पल्लवी मित्तलचा झंझावात

३५ वर्षांवरील महिला दुहेरी गटात पल्लवी मित्तल हिने वरदा दीक्षितसोबत शानदार खेळ करत कांस्य पदक पटकावले. उपांत्य फेरीत पुण्याच्या नुपूर प्रबिनू या जोडीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. या गटात तब्बल १०० जोड्यांचा सहभाग होता, ज्यातून पल्लवी-वरदा जोडीने दमदार वाटचाल करत पदक मिळवले.

 

प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी

पल्लवी मित्तल यांनी कनिष्ठ गटात अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत अनुभवाची शिदोरी जमा केली आहे. श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघीही अंधेरी पश्चिम येथील छत्रपती शहाजी राजे क्रीडा संकुलातील सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षक सुश्रुत करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.

 


मुंबईच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची कामगिरी

या स्पर्धेत मिळवलेली कांस्य पदके ही केवळ वैयक्तिक यश नसून मुंबईच्या बॅडमिंटन क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरली आहेत. अनुभवी खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे आगामी स्पर्धांसाठी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.


Post a Comment

0 Comments