खेलो इंडिया ट्रायबल गेम्समध्ये कर्नाटकचा दबदबा!
महाराष्ट्र चौथ्या स्थानावर
६ सुवर्ण, १० रौप्य, ४ कांस्यसह २० पदकांची कमाई
रायपूर : आदिवासी क्रीडा शक्तीचा भव्य महोत्सव ठरलेल्या
१ ली खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धा
२०२६ मध्ये अखेरच्या दिवशी रोमांचक घडामोडींनंतर कर्नाटकने ओव्हरऑल चॅम्पियनशिपवर शिक्कामोर्तब
करत देशभरात आपला दबदबा सिद्ध केला! तर
महाराष्ट्राने ६ सुवर्ण,
१० रौप्य आणि ४ कांस्य
अशा एकूण २० पदकांसह चौथे स्थान पटकावत दमदार कामगिरी नोंदवली. संपूर्ण स्पर्धेत प्रतिभेचा झरा उसळताना दिसला आणि
भारताच्या क्रीडा भविष्याची झलकही पाहायला मिळाली.
कर्नाटकचा जलतरणात जलवा;
एकूण विजेतेपदावर
कब्जा
स्पर्धेच्या सुरुवातीपासून आघाडी घेतलेल्या
कर्नाटकने २३ सुवर्ण,
८ रौप्य व ७ कांस्य
पदकांसह अव्वल स्थान पटकावले. विशेषतः जलतरणात १५ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्य पदकांची कमाई,
त्यासोबत अॅथलेटिक्समध्ये ५ आणि कुस्तीमध्ये ३ सुवर्ण पदके
जिंकत त्यांनी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.
ओडिशा व झारखंडची जोरदार टक्कर
ओडिशाने २१ सुवर्ण, १५ रौप्य व २१ कांस्य (एकूण ५७ पदके)
जिंकत दुसरे स्थान मिळवले आणि सर्वाधिक पदकांची कमाई करणारा
संघ ठरला. तर झारखंडने १६ सुवर्ण, ८ रौप्य व ११ कांस्य पदकांसह तिसरे स्थान
पटकावले. अॅथलेटिक्स, कुस्ती व तिरंदाजीमध्ये झारखंडचा प्रभाव ठळक राहिला.
महाराष्ट्राची भक्कम कामगिरी;
टॉप-५ मध्ये स्थान
महाराष्ट्राने ६ सुवर्ण,
१० रौप्य व ४ कांस्य
अशा २० पदकांसह चौथे स्थान मिळवले. विविध क्रीडा प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करत
महाराष्ट्राने टॉप-५ मध्ये स्थान निश्चित केले. खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनामुळे राज्याचा क्रीडा
दर्जा पुन्हा अधोरेखित झाला.
मेजबान छत्तीसगड नवव्या स्थानावर
मेजबान छत्तीसगडने ३ सुवर्ण,
१० रौप्य व ६ कांस्य
पदकांसह नववे स्थान मिळवले. विशेष म्हणजे पुरुष फुटबॉलच्या अंतिम सामन्यात छत्तीसगडला पश्चिम
बंगालकडून ०–१ असा पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
फुटबॉलमध्ये पश्चिम बंगालचा विजय
पुरुष फुटबॉल अंतिम सामन्यात पश्चिम बंगालने छत्तीसगडवर १–०
विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले, तर अरुणाचल प्रदेश व गोवा यांनी कांस्य पदक मिळवले.
अंतिम लढत अत्यंत चुरशीची ठरली.
तिरंदाजीतील थरार; कोमालिका आणि अर्जुनचे सुवर्ण
महिला रिकर्व वैयक्तिक प्रकारात कोमालिका बारी (झारखंड)
हिने सुवर्ण, भार्गवी भगोरा (गुजरात) रौप्य,
तर रुओविनुओ थेउनुओ (नागालँड) कांस्य पटकावले.
पुरुष रिकर्व वैयक्तिक प्रकारात
अर्जुन खारा (ओडिशा) सुवर्ण, सोमनाथ हेम्ब्रम (ओडिशा) रौप्य,
तर पवन परमार (मध्य प्रदेश) कांस्य विजेते ठरले.
पुरुष टीम प्रकारात झारखंडने
सुवर्ण, ओडिशा
रौप्य, तर
मेघालयने कांस्य
जिंकले; महिला टीम प्रकारात नागालँडने सुवर्ण,
झारखंड रौप्य,
मध्य प्रदेश कांस्य
पटकावले.
स्पर्धेतील सुपरस्टार खेळाडू
कर्नाटकचा मणिकांत एलने ८ सुवर्ण व १ रौप्य पदकांसह
सर्वाधिक यशस्वी खेळाडू ठरला, तर धोनीश एनने ५ सुवर्ण व १ रौप्य पदके
जिंकली. महिला गटात ओडिशाची अंजली मुंडाने ५ सुवर्ण,
तर कर्नाटकच्या मेघांजलीने ४ सुवर्ण व २ कांस्य पदके
जिंकून आपली छाप पाडली.
देशभरातील प्रतिभेचा विस्फोट
या स्पर्धेत ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेश सहभागी
झाले, त्यापैकी २५ संघांनी पदकतालिकेत स्थान मिळवले,
तर २० संघांनी किमान १ सुवर्ण पदक जिंकले.
यामुळे देशभरातील आदिवासी भागात असलेली क्रीडा प्रतिभा
अधोरेखित झाली.

Post a Comment
0 Comments