विक्रोळीत कबड्डीचा महासंग्राम
आमदार चषक स्पर्धेला शनिवार पासून दमदार
सुरुवात!
सुनील राऊत यांच्या पुढाकारातून बक्षिसांचा
वर्षाव
१६ पुरुष व १५ महिला संघांसह प्रो स्टार्सचा
थरार
चढाई-पकडींचा थरार, विक्रोळी सज्ज!
मुंबई : ‘कबड्डी कबड्डी’च्या जयघोषात विक्रोळीची
क्रीडानगरी आजपासून अक्षरशः दणाणणार आहे! आमदार सुनील राऊत यांच्या भव्य संकल्पनेतून साकारलेल्या आमदार चषक
कबड्डी स्पर्धेत राज्यातील तगड्या संघांचा महासंग्राम रंगणार असून तब्बल १० लाखांहून
अधिक बक्षिसांची उधळण या स्पर्धेचे आकर्षण ठरली आहे. १८ ते २१ एप्रिल दरम्यान टागोर
नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रंगणाऱ्या या स्पर्धेकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष
लागले आहे.
भव्य आयोजन : कबड्डी पंढरीत रंगणार संघर्ष
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रीमान योगी
प्रतिष्ठानच्या संयोजनाखाली आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना व मुंबई उपनगर
कबड्डी संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आंबेडकर
उद्यानातील क्रीडानगरीला ‘कबड्डी पंढरी’चे रूप देण्यात आले असून दोन मॅटवर
रंगणाऱ्या लढतींमुळे चाहत्यांना प्रो कबड्डीला साजेशी रोमांचक चढाओढ अनुभवायला
मिळणार आहे.
बक्षिसांचा पाऊस : खेळाडूंना लखपती बनवण्याचा
संकल्प
या स्पर्धेत बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे! व्यावसायिक
पुरुष गटातील विजेत्या संघाला २ लाख, उपविजेत्याला १.५ लाख, तर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे
पारितोषिक मिळणार आहे. महिला गटात विजेत्या संघाला १ लाख, उपविजेत्याला ७५ हजार, तर उपांत्य फेरीतील संघांना ३५ हजार रुपयांचे बक्षीस
देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्वोत्तम खेळाडूंना मोटार बाईक आणि स्कूटी देऊन गौरवण्यात येणार असल्याने पहिल्याच
सामन्यापासून खेळाडू आक्रमक खेळासाठी सज्ज झाले आहेत.
प्रो कबड्डी स्टार्सची एंट्री : सुपरस्टार्सचा
जल्लोष
या स्पर्धेचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रो कबड्डीतील तब्बल ३० सुपरस्टार्स मैदानावर उतरणार
आहेत. पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, संकेत सावंत, अस्लम इनामदार, साहिल राणे, सुशांत साईल, अजिंक्य कापरे यांसारखे दिग्गज खेळाडू आपल्या झंझावाती चढाया
आणि भक्कम पकडींनी प्रेक्षकांना थरारून सोडणार आहेत.
पुरुष संघांचा दमदार सहभाग : राज्यभरातील बलाढ्य
संघ आमने-सामने
व्यावसायिक पुरुष गटात युवा पलटण, भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे, सीजीएसटी, न्यू इंडिया अॅश्युरन्स, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोस्टल, युनियन बँक, लिब्रा अॅग्रो, ठाणे महानगरपालिका, रुपाली ज्वेलर्स, संत सोपानकाका सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार, आयकर, मिडलाइन फाऊंडेशन, डीवाय पाटील असे तगडे १६ संघ विजेतेपदासाठी झुंज देणार आहेत.
महिला संघांची चुरस : रणरागिणींचा जोशपूर्ण
सहभाग
महिला गटातही १५ संघ जोरदार लढत देणार असून त्यात स्वराज्य
स्पोर्ट्स क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, महात्मा गांधी अकादमी, शिवशक्ती महिला संघ, डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, विवेक संघ, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी, कुलाई क्रीडा मंडळ, राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स क्लब, तात्या बालवडकर स्पोर्ट्स क्लब, पतंगराव कदम, अनिकेत स्पोर्ट्स क्लब, शिवाजी उदय स्पोर्ट्स क्लब, होतकरू मित्र मंडळ या संघांचा समावेश आहे. रणरागिणींच्या झुंजार
खेळामुळे स्पर्धेला अधिक रंगत येणार आहे.
विक्रोळीत कबड्डीचा जल्लोष शिगेला!
आमदार सुनील राऊत यांच्या दिमाखदार आयोजनामुळे विक्रोळीतील ही
स्पर्धा कबड्डीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. दमदार संघ, सुपरस्टार खेळाडू आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी
यामुळे ‘आमदार चषक’ स्पर्धा म्हणजे कबड्डीचा खरा उत्सव ठरणार आहे. विक्रोळीची
क्रीडानगरी पुढील चार दिवस कबड्डीच्या थराराने अक्षरशः धगधगणार, यात शंका नाही!

Post a Comment
0 Comments